आगामी २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे धार्मिक मेळे, यात्रा आणि तीर्थक्षेत्रांमध्ये सेवा देणाऱ्या युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार असून, कुंभमेळ्यात भाविकांचे स्वागत, मार्गदर्शन आणि व्यवस्थापनासाठी हजारो प्रशिक्षित युवक कार्यरत राहतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
दाक्षिणात्य सुपरस्टार झाली IAS! मोठा पडद्यावर अनेकदा झळकून आता करतेय देशसेवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे राबविण्यात येणारा हा अल्पमुदतीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्याच्या (National Skill Qualification Framework – NSQF) मान्यतेने सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात युवकांना धार्मिक वातावरणातील आचारसंहिता, भाविकांशी संवाद, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती, तसेच सामाजिक समन्वय अशा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मंत्री लोढा म्हणाले, “नाशिक कुंभमेळा ही केवळ धार्मिक घटना नसून, ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्व व्यवस्था सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशिक्षित आणि संस्कारित युवकांची मोठी गरज आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ती गरज पूर्ण होईल.” या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ कुंभमेळ्यापुरतेच नव्हे, तर इतर तीर्थक्षेत्रांमध्येही प्रशिक्षित युवक सेवा देतील. त्यांना धार्मिक पर्यटन, कार्यक्रम व्यवस्थापन आणि सामाजिक संवाद या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशातील इतर राज्यांमध्येही राबविण्याची योजना आहे, अशी माहिती कौशल्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी
या अभिनव उपक्रमामुळे पारंपरिक वैदिक संस्कार आणि आधुनिक व्यवस्थापन कौशल्य यांचा संगम साधला जाणार असून, या प्रशिक्षणातून तयार होणारे युवक भाविकांच्या सेवेत शिस्त, समर्पण आणि संस्कार यांचे उत्तम उदाहरण ठरतील. त्यामुळे आगामी नाशिक कुंभमेळा अधिक सुयोजित आणि संस्मरणीय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.