फोटो सौजन्य- सोशल मीडिया
RRB Group D Exam Date 2026 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने ‘ग्रुप-डी सीबीटी-१’ (RRB Group-D CBT-1) परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. या मेगाभरती प्रक्रियेच्या माध्यमातून रेल्वेमधील विविध विभागांतील एकूण २२,१९५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली असून परीक्षा ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे.
रेल्वे भरती बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रुप-डी सीबीटी-१ परीक्षा ०३ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे शहर आणि तारीख याची माहिती परीक्षा सुरू होण्याच्या १० दिवस आधी उपलब्ध करून दिली जाईल. तर अधिकृत प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा सुरू होण्याच्या ४ दिवस आधी रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.
या परीक्षेमध्ये उमेदवारांना ९० मिनिटांत १०० गुणांचे १०० प्रश्न सोडवावे लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सामान्य विज्ञान, गणित,चालू घडामोडी आणि रिझनिंग यांसारख्या विषयांचा समावेश होतो. या परीक्षेत १/३ (एक-तृतीयांश) गुणांची निगेटिव्ह मार्किंग लागू असेल. म्हणजेच प्रत्येक ३ चुकीच्या उत्तरांमागे १ गुण वजा केला जाईल. त्यामुळे उमेदवारांना काळजीपूर्वक प्रश्न सोडवावे लागणार आहेत.
परीक्षेमध्ये पुढील टप्प्यासाठी पात्र ठरण्यासाठी रेल्वेने किमान गुणांची टक्केवारी (Cut-off) निश्चित केली आहे:
जनरल आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्ग: किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य.
एससी, एसटी, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्ग: किमान ३० टक्के गुण मिळवणे आवश्यक.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २२,१९५ पदांपैकी सर्वाधिक जागा ‘ट्रॅक मेंटेनर’ आणि ‘पॉइंट्समॅन’ या पदांसाठी राखीव आहेत. तर ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV, पॉइंट्समॅन-बी, असिस्टंट,ऑपरेशन असिस्टंट,असिस्टंट ब्रीज,असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट (TL & AC),असिस्टंट लोको शेड यांसारख्या पदांचा समावेश होतो. उमेदवारांना वेळेवर अपडेट्स मिळवण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






