फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Pune University Degree Scam News: देशात सध्या NEET परीक्षा पेपरफुटीवरून संतापाची लाट पसरलेली असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी देण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला असून, एका रिक्षाचालकाला दीड लाख रुपयांत ‘बी.कॉम’चे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महेश कदम नावाच्या रिक्षाचालकाने आपल्या मुलासाठी पुणे विद्यापीठाची पदवी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी विद्यापीठातील वित्त आणि सेवा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे. सुरुवातीला B.Com चे बनावट पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र अखेर दीड लाख रुपयांवर हा व्यवहार ठरल्याचा आरोप रिक्षाचालक महेश कदम यांनी केला आहे.
विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित अधिकारीच या प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी धावपळ उडाली आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बनावट पदवी प्रकरणात विद्यापीठातील कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी खरोखरच सहभागी आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत औपचारिक घोषणा करण्यात आलेली नसली तरी या दाव्याने विद्यापीठाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
राज्यात आधीच MHT-CET आणि MPSC परीक्षांच्या पेपरफुटीवरून वाद सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकताच MPSC च्या ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता थेट नामांकित पुणे विद्यापीठातूनच बोगस पदवी प्रमाणपत्र वितरीत केले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






