(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ram Gopal Varma: नीट (NEET ) पेपरफुटी प्रकरणानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर केले आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत असताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी शिक्षण व्यवस्थेबाबत वेगळाच प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दोन सविस्तर पोस्ट शेअर करत पारंपरिक शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, AI मुळे शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून, जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची वेळ आली आहे.
त्यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या पाठांतरावर नव्हे, तर AI चा वेगाने आणि सर्जनशीलतेने वापर करण्याच्या क्षमतेवर आधारित असावी. भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने हे अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांचे मत आहे.
राम गोपाल वर्मा यांनी शिक्षण धोरणात काही महत्त्वाचे बदल सुचवले. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीनुसार परीक्षा देण्याची मुभा असावी. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कालावधीही विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार ठरवला जावा. काही विद्यार्थी सहा महिन्यांत एखादे कौशल्य आत्मसात करतात, तर काहींना त्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे सर्वांसाठी समान कालावधीचे शिक्षण योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
पोस्टच्या शेवटी राम गोपाल वर्मा यांनी केवळ सुधारणा नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात AI आधारित क्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, AI मुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील अनेक मर्यादा दूर होऊ शकतात आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.






