पुणे विद्यापीठात बोगस डिग्री रॅकेट? 3 लाखांत पदवी; जाणून घ्या नेमका प्रकार काय... (फोटो - Istock)
पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने 3 लाख रुपयांच्या मोबदल्यात बनावट पदवी प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रिक्षाचालक महेश कदम यांच्या सतर्कतेमुळे हा कथित गैरप्रकार उघडकीस आला असून, संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रिक्षाचालक महेश कदम हे मुलाच्या उच्च शिक्षणाविषयी माहिती घेण्यासाठी विद्यापीठात गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी अन्य ३ ते ४ साथीदारांसह ३ लाखांच्या मोबदल्यात बी. कॉम. पदवीचे प्रमाणपत्र मिळवून देण्याची तयारी दर्शवल्याचा आरोप महेश यांनी केला आहे. ठरल्याप्रमाणे कदम यांनी सुरुवातीला काही पैसे दिले. नंतर या लोकांनी त्यांना बी. कॉम.चे कथित पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र, प्रमाणपत्रावर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ ऐवजी ‘युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असा उल्लेख असल्याने त्यांना संशय आला. तसेच वेगवेगळ्या वर्षांची ४ पदवी प्रमाणपत्रे दाखवण्यात आल्याने संशयाला बळ मिळाले.
विद्यापीठ प्रशासनाकडे धाव
कदम यांनी हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे विद्यापीठातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या कथित रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
विद्यापीठाने नेमली सत्यशोधन समिती
पुणे विद्यापीठाकडे एका विशिष्ट विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्र व पदवीसंबंधी तक्रार आली आहे. तक्रारीत विद्यापीठाच्या नावाने गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे बनावट तयार केल्याचे नमूद आहे. विद्यार्थ्यांची यात आर्थिक फसवणूक झाल्याचेही म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्रकाराची दखल घेतली असून, सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी कुलगुरूंच्या आदेशाने सत्यशोधन समिती गठित करण्यात आली आहे.
बोगस पदवीच्या आधारे 8 वर्षे नोकरी
दुसऱ्या एका घटनेत, बनावट पदवी प्रमाणपत्राच्या मदतीने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) येथे नोकरी मिळवलेल्या एका परप्रांतीयाचा कारनामा उघडकीस आला आहे. मागील आठ वर्षांपासून तो कनिष्ठ कार्यालय सहाय्यक म्हणून काम करत होता, हे विशेष ! बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या आरोपीविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






