फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्राचं आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचं तारखेप्रमाणे जन्मोत्सव अगदी काही दिवसांवर आहे. महाराजांचा प्रत्येक मावळा या दिवसाची वाट पाहत असतो. अखेर तो दिवस जवळ आहे. या दिवसात निरनिराळ्या ठिकाणी शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित होत असतात. या कार्यक्रमांमध्ये महाराजांना त्रिवार मुजरा करत सगळ्यांना संबोधित करण्याची संधी मुळीच सोडू नका. या कार्यक्रमांमध्ये हे भाषण नक्की द्या आणि लोकांना जागृत करा:
असे व्यक्तिमत्व फार कमीच होतात. ज्यांच्यामध्ये आपल्याला आपली आई, आपला बाप फक्त इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात देवाचेच दर्शन घडते. रयतेवर आईसारखी माया करणारा, रयतेच्या मागे बापासारखा कणखर उभा असणारा माझा राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज! छत्रपती या नावाला साजेल असं कर्तृत्व माझ्या राजाचं आणि त्यांच्यामुळेच आपण सगळे दिवस पाहतोय आजचं… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर प्रतिमेस मानाचा त्रिवार मुजरा करत तुमच्या रक्तात भगवी लाट आणण्यास हा मर्द मावळा तयार आहे. आता येणाऱ्या प्रत्येक शहाऱ्यांना मुजरा करत चला कारण शरीरावर येणारे बाकी शहारे एकीकडे आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे नाव ऐकल्यावर येणारे शहारे एकीकडे! या नावातच एक शक्ती आहे. फक्त नाव घेतले तरी मान गर्वाने उंचावते. छाती अभिमानाने भरून येते. डोळ्यांमध्ये एक आग संचारते. इतकेच नव्हे तर महाराजांच्या स्मरणाने मोठमोठे आव्हानेही लहान वाटू लागतात. अरे, लाखो दुश्मनांना नंग्या तलवारींनी जमीनदोस्त करणाऱ्या मर्द मावळ्यांचे आपण वंशज, आपल्याला काय आव्हानांची भीती! आपले रक्त सळसळवण्यासाठी छत्रपतींचा जयघोषच पुरेसा आहे.
छत्रपतींचा हा ३९५वा जन्मोत्सव आहे. जगभरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम सुरु आहेत. किमान आजच्या दिवशी तरी शिवरायांचे आचार विचार असलेली खरी भगवी लाट जगभरात पाहायला मिळते. परंतु, फक्त आजच्या पुरतीच! आजचा दिवस संपूद्या मग स्वतःला छत्रपतींच्या विचारांवर आम्ही चालतोय असे सांगणारी आजची मंडळी पुन्हा त्यांचे रंग दाखवण्यास सुरुवात करतील. अरे, आपल्याला महाराजांचे विचारच कधी कळले नाहीत मग आपण काय त्या विचारांवर चालणार. आपल्याला ते विचार कळले असते तर देशात आज जे काही जाती पाती आणि धर्माच्या नावाने खेळ चालू आहेत तो खेळ तिथे नसता. या खेळाला जबाबदार आपणच आहोत. कारण राजांनी शिकवले एक आणि आपण करतोय भलतंच!
आपल्याला देशात भगवी लाट हवी आहे. पण ती लाट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि तत्वांची हवी आहे. ही भगवी लाट तेव्हाच दिसून येईल जेव्हा आपल्या महाराजांचे गड किल्ले पडक्या अवस्थेत नसून त्यांची दुरुस्ती केली जाईल. आताच वेळ आहे, एकत्र व्हा! आपला आवडता राजकारणी जिंकून येईल आणि गड किल्ले सुधारेल या आशेवर राहिलात, तर पडीक अवस्थेत असलेले गड किल्यांचे अवशेष आणखीन कोसळतील. हातावर हात ठेवून कुणी हे काम करतंय का? याची वाट बघत बसू नका. स्वतःला महाराजांचे खरे मावळे म्हणतं असाल तर हालचाल करा. ज्या संघटना आणि संस्था गड किल्ल्यांची दुरुस्ती करत आहेत, त्यांना फुल ना फुलांची पाकळी म्हणून स्वतःकडून काही तरी मदत करा आणि हे स्वराज्याचे विशाल आणि मौल्यवान धन जपण्यास योगदान द्या.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय शिवराय!