फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत सौर ऊर्जा जनजागृती अभियान २०२५ चे आयोजन विवा महाविद्यालय, विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडले. सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा महाविद्यालय यांच्या संयुक्त पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या दोन दिवसीय उपक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे, प्राचार्य डॉ. एस. एस. खरात (मॉडर्न कॉलेज, पुणे), विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. दीपा वर्मा, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात ‘सौर ऊर्जा पर्यावरण रक्षण आणि उर्जासुरक्षेसाठीचा प्रभावी उपाय’ या विषयावर माहितीपट दाखवण्यात आला. हा माहितीपट करिअर कट्टा अॅपवरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यावर आधारित प्रश्नोत्तरी देखील आयोजित करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या या अभियानात एकूण ५५,५५५ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट आहे. विवा महाविद्यालयातील सहभागास मान्यता देत संस्था आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयीची जाण वाढण्यास हातभार लागणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय हितेंद्रजी ठाकूर, सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर तसेच समिती सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन. पाध्ये यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक नारायण कुट्टी आणि करिअर संसदेचे विद्यार्थी, करिअर कट्टा समिती सदस्य व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.