संग्रहित फोटो
सोनाजी गाढवे/ पुणे : राज्याच्या बहुजन कल्याण विभागाच्या २०२६-२७ परदेशी शिष्यवृत्ती जाहिरातीत ७५ पैकी २५ जागा अभियांत्रिकीसाठी राखीव ठेवल्याने इतर शाखांतील ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे एकाच वर्गाचा प्रभाव राहण्याची भिती निर्माण झाली आहे. अशी माहिती स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थापक अँड. कुलदीप आंबेकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेत शैक्षणिक शुल्क, राहणीमान खर्च आदी सर्व खर्च शासनाकडून केला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये या योजनेबाबत मोठा प्रतिसाद असतो. मात्र, सन २०२६-२७ साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत शाखानिहाय जागावाटपात असंतुलन असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण ७५ जागांपैकी २० पदव्युत्तर व ५ पीएचडी अशा २५ जागा अभियांत्रिकी शाखेसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच जवळपास एक-तृतीयांश जागा केवळ एका क्षेत्रासाठी राखीव आहेत.
या निर्णयावरून इतर शाखांतील विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी कला, वाणिज्य, समाजशास्त्र, कायदा, व्यवस्थापन, कृषी, आरोग्य विज्ञान आदी विविध क्षेत्रांत शिक्षण घेत असून, सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका व्यक्त होत आहे.
परदेशी शिष्यवृत्ती योजना ही केवळ अभियांत्रिकी शिक्षणापुरती मर्यादित नसून, विविध क्षेत्रांतील तज्ञ घडविण्याचे साधन आहे. धोरणनिर्मिती, प्रशासन, सामाजिक विकास, संशोधन, कायदा आणि अर्थव्यवस्था यांसाठी विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देणे आवश्यक आहे. अन्यथा शिक्षण व्यवस्थेत असंतुलन निर्माण होईल. एकाच वर्गाचा प्रभाव राहील. -अँड. कुलदीप आंबेकर (संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हँड्स)
| शाखा | (मंजूर विद्यार्थी संख्या) पदवी/ पदव्यूत्तर | पीएचडी | एकूण |
|---|---|---|---|
| अभियांत्रिकी | २० | ५ | २५ |
| वास्तूकलाशास्त्र | ४ | २ | ६ |
| व्यवस्थापन | २ | १ | ३ |
| विज्ञान | १० | ५ | १५ |
| वाणिज्य आणि अर्थशास्त्र | ४ | ५ | ९ |
| कला | ४ | ५ | ९ |
| विधी | ४ | १ | ५ |
| औषधनिर्माण शास्त्र | २ | १ | ३ |
| एकूण | ५० | २५ | ७५ |






