फोटो सौजन्य - Social Media
सुरुवातीच्या काळात आराध्याला शिक्षणात अनेक अडचणी येत होत्या. विशेषत: इंग्रजी विषय तिच्यासाठी कठीण वाटत असे. तिला वर्गात बोलताना संकोच वाटे, चुका होतील या भीतीने ती हात वर करत नसे. पण तिच्या TFI दीदी-भैयांनी तिच्यातील लपलेली चमक ओळखली. त्यांनी तिच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि तिला केवळ अभ्यासच नव्हे तर मूलभूत मूल्यांचे महत्त्वही शिकवले. प्रामाणिकपणा, आदर, टीमवर्क आणि संयम ही मूल्ये तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत गेली.
रूचिता दीदी आणि शिवानी दीदींनी आराध्याला केवळ शिकवले नाही, तर तिला प्रेरित केले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आराध्याला इंग्रजी समजणे सोपे झाले. जी भाषा कधी तिला कठीण वाटायची, तीच नंतर तिची आवडती विषय बनली. सुरुवातीला भिती वाटणारा गणित विषयसुद्धा तिच्यासाठी आनंददायी झाला. योग्य शिकवण, योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन म्हणजे विद्यार्थ्याच्या आयुष्यात किती मोठा फरक घडवू शकते, हे आराध्याच्या बदललेल्या शिकण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येते.
TFI च्या वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या वर्गात एकजूट, आपुलकी आणि टीमवर्क कमी जाणवत होतं. पण तिच्या दीदींनी मुलांमध्ये एकमेकांबद्दल आदर, सहकार्य आणि शांततेचे वातावरण निर्माण केले. हळूहळू आराध्या अधिक आत्मविश्वासू झाली, सर्वांसोबत निर्भयपणे बोलू लागली आणि समस्यांचे निराकरण स्वतः शोधू लागली. आराध्याच्या आयुष्यातील एक खास क्षण म्हणजे TFI च्या मोठ्या कार्यक्रमात तिने दिलेले मंचावरचे सादरीकरण. हा क्षण तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. जेव्हा तिने स्वतःच्या आवाजात, स्वतःच्या आत्मविश्वासाने एक परिपूर्ण सादरीकरण केले, तेव्हा तिला जाणवले “मीही करू शकते!”
आज आराध्या स्वतः टीच फॉर इंडिया फेलो बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ज्या मुलांना वाचता-लिहिता येत नाही, ज्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना शिकवण्याची तिची इच्छा आहे. ती सांगते की, “माझ्या दीदी-भैयांनी मला बदलले, तसंच मीही एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवू शकले तर तेच माझं खरं यश असेल.” आराध्याची कहाणी ही शिक्षणाच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण आहे. ती फक्त पुस्तकी ज्ञानाबाबत नाही, तर आत्मविश्वास, मूल्यांची जाण, स्वतःची ओळख आणि समाजाचे ऋण फेडण्याच्या विचाराबद्दल आहे. TFI फेलोजच्या प्रेम, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आराध्या आज स्वावलंबी, निर्भय आणि प्रेरणादायी व्यक्ती बनून उभी आहे. भावी पिढ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा तिचा निर्धार मनाला स्पर्श करणारा आहे. आराध्या सांगून जाते. “योग्य मार्गदर्शन, आणि थोडासा विश्वास… एखाद्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.”






