फोटो सौजन्य - Social Media
या उपक्रमाने अल्प कालावधीतच चांगली प्रगती दाखवली असून, ७ राज्यांतील २४० शाळांमधील १,१४,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचला आहे. वाढत्या डिजिटल जगात मुलांना जाहिरात संदेश ओळखता यावेत, त्यांचे विश्लेषण करता यावे आणि संभाव्य हानिकारक किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून स्वतःचे रक्षण करता यावे, यासाठी आवश्यक विचारसरणी व निरीक्षण कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
एएससीआय अकॅडमी या विद्यार्थ्यांमधील जाहिरात साक्षरतेतील बदल सतत मोजते. जाहिरात ओळखण्याची क्षमता, कंटेंट आणि जाहिरात यातील फरक समजण्याची कौशल्ये, पालक व शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय यावर आधारित संपूर्ण मूल्यमापन केले जाते. सत्रांपूर्वी व सत्रांनंतर घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून या उपक्रमाचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. इयत्ता तिसरी ते पाचवीमधील जाहिरात साक्षरतेची टक्केवारी ५९ वरून ८६ इतकी झाली, तर सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांमध्ये ही वाढ ५७ वरून ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. ‘स्मार्ट किड्स. स्मार्ट चॉईसेस.’ अशी टॅगलाइन असलेला अॅडवाइज कार्यक्रम डिजिटल साक्षरतेतील मोठ्या तफावतीवर काम करतो. आजची मुले डिजिटल विश्वात अधिक गुंतलेली असली, तरी त्यांच्याकडे सूक्ष्म, हुशारीने केलेल्या जाहिराती ओळखण्याची पुरेशी जागरूकता नसते. त्यामुळेच हा उपक्रम मुलांना योग्य माहिती देऊन त्यांचे संरक्षण मजबूत करतो.
एएससीआयच्या सीईओ मनिषा कपूर म्हणाल्या, “आजची पिढी ऑनलाइन आणि वास्तविक जगात विविध प्रकारच्या मार्केटिंग संदेशांचा मोठ्या प्रमाणात सामना करते. मात्र या संदेशांचा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात नसते. मुलं, पालक आणि शिक्षकांना जाहिरातींचा प्रभाव समजून देणे आणि त्यांचे विश्लेषण करण्यास सक्षम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा उपक्रम आता दिल्ली एनसीआर, मुंबई, पुणे, नागपूर, लखनौ, वाराणसी, इंदौर, भोपाळ, पटणा, जयपूर, जोधपूर आणि कोलकाता येथे राबवला जात आहे. एनजीओ स्कूल हेल्थ अॅन्युअल रिपोर्ट प्रोग्राम (SHARP) हा एएससीआयचा अंमलबजावणी भागीदार आहे. पुढील टप्प्यात तामिळनाडू, तेलंगणा, पंजाब, आसाम आणि कर्नाटक या राज्यांतही विस्तार करण्यात येणार आहे.
अॅडवाइजमध्ये दोन वयोगटांसाठी स्वतंत्र, एक तासांचे वर्कशॉप आयोजित केले जातात. तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी जाहिरात म्हणजे काय, ती कशी लक्ष वेधून घेते, जाहिरात व कंटेंटमधील फरक, दिलेली आश्वासने आणि त्यांच्या परिणामांची समज यांवर भर. सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या जाहिराती, प्रेरक तंत्रे, केस स्टडीज, प्रभावी जाहिरातींची रचना आणि ऑनलाईन सुरक्षितता यांचा समावेश. कार्यक्रमात गेमिफाईड कंटेंट, प्रेझेंटेशन, हँडबुक, व्हिडिओज आणि पालकांसाठी विशेष टिप्स दिल्या जातात. सर्व सामग्री इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये उपलब्ध असून तमिळ व कन्नड भाषांमध्ये भाषांतर सुरू आहे. या संपूर्ण उपक्रमाद्वारे एएससीआय मुलांमध्ये योग्य जाहिरात ओळखण्याची क्षमता, जागरूकता आणि सुयोग्य निर्णयक्षमता विकसित करण्याचा संकल्प बाळगते.






