फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही भारतातील सर्वांत कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण त्यातील फारच थोड्यांना यश मिळते. आज आपण अशाच एका जिद्दी आणि मेहनती मुलीची गोष्ट पाहणार आहोत, जी एका छोट्याशा गावातून पुढे येऊन IAS अधिकारी बनली. या मुलीचे नाव आहे तपस्या परिहार.
तपस्याचा जन्म मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील जोबा या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील एक साधे शेतकरी आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मूनही ती मोठे स्वप्न पाहू शकली, याचे श्रेय तिच्या आत्मविश्वासाला आणि मेहनतीला द्यावे लागेल.
तिने आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून (KV) पूर्ण केले. यानंतर तिने पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी कॉलेज (ILS Law College) मधून कायद्याची पदवी (LLB) घेतली. शिक्षणादरम्यानच UPSC अधिकारी होण्याचे स्वप्न तिच्या मनात आकार घेऊ लागले. पदवी मिळाल्यानंतर तिने पूर्णपणे UPSC च्या अभ्यासाला सुरुवात केली. तपस्याने पहिल्या प्रयत्नात UPSC च्या प्रीलिम्समध्ये अपयश अनुभवले. पण या अपयशाने ती खचली नाही. उलट, तिने या अपयशातून धडा घेत कोचिंग क्लास न घेता घरात बसून सेल्फ-स्टडी करण्याचा निर्णय घेतला. ती दररोज अभ्यासाच्या तासांची आखणी करू लागली, जुने प्रश्नपत्रिका सोडवू लागली आणि नियमित रिविजनवर भर दिला.
तिची ही मेहनत आणि चिकाटी अखेर फळाला आली. UPSC 2017 मध्ये तिने अख्ख्या देशात 23वी रँक मिळवत IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. ही केवळ तिचीच नव्हे, तर तिच्या कुटुंबाची, गावाची आणि त्या हजारो विद्यार्थ्यांची प्रेरणा ठरली जे कमी साधनांमध्ये मोठी स्वप्ने पाहतात. तपस्या परिहार यांची ही यशोगाथा सांगते की, जिद्द, नियोजन आणि सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही! आज UPSC ची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी तपस्या एक फार मोठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. तपस्याच्या या घोर प्रयत्नांना आमचा सॅल्यूट!