फोटो सौजन्य - Social Media
सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, तरुणांना डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. याच उद्देशाने, स्वयंसेवी संस्था WHT NOW ने मुंबईतील नामांकित HSNC विद्यापीठासोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, सेक्स्टॉर्शन, सायबर बुलिंग, ओळख चोरी यांसारख्या गंभीर विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हा उपक्रम WHT NOW च्या नॅशनल यूथ अॅम्बेसेडर प्रोग्रॅमचा भाग असून, संस्थेचे उद्दिष्ट २०२५ अखेरपर्यंत देशभरातील ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे आहे. HSNC विद्यापीठ हा या उपक्रमाचा पहिला भागीदार असून, या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना सायबर फर्स्ट रिस्पॉन्डर्स म्हणून घडवण्यात येणार आहे. हे विद्यार्थी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर इतरांना मदत करण्यासाठीही सक्षम असतील. या प्रशिक्षणात सायबर सुरक्षा तज्ज्ञ, कायदेविषयक सल्लागार व मानसिक आरोग्य विशेषज्ञांचा समावेश असलेली सत्रं आयोजित केली जातील. यात सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांचे भावनिक परिणाम, कायदेशीर उपाय व योग्य प्रतिसाद यांची माहिती दिली जाईल.
WHT NOW च्या संस्थापक नीती गोयल यांनी सांगितले की, “आम्ही HSNC विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार नुकताच पूर्ण केला असून, लवकरच कार्यक्रम सुरू होईल. ही भागीदारी विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी निर्णायक ठरेल.” सह-संस्थापक अक्षत खेतान म्हणाले, “सायबर गुन्हे कॅन्सरप्रमाणे गुपचूप वाढतात. कायदेशीर उपाय उपलब्ध असले तरी ते वेळखाऊ आणि खर्चिक असतात. त्यामुळे सजगता आणि वेळेवर कारवाई महत्त्वाची आहे.” ते पुढे म्हणाले, “आमचा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सायबर सुरक्षेचा दूत बनवण्याचा आहे.”
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “ही भागीदारी केवळ शैक्षणिक नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या डिजिटल, मानसिक आणि सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.” सायबर छळ व फसवणूक प्रकरणांसाठी WHT NOW ने राष्ट्रीय हेल्पलाइन (+91-9019115115) सुरू केली असून, आतापर्यंत ४० हून अधिक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.