संग्रहित फोटो
पुणे : बिबवेवाडीत एस. के बार अँड परमिट रूममध्ये बिलावरून झालेल्या वादानंतर तीन ग्राहकांना मारहाण केल्याप्रकरणात तब्बल १२ जणांवर गुन्हा नोंदविला आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. ओंकार रवींद्र आंधळकर (वय २६), गजानन शिवाजी खुडे (वय ४०), अजय धनंजय नाईक (वय ३५, तिघे रा. ओटा परिसर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान याप्रकरणी एस के बार अँड रेस्टोरंटतील कामगार इजाज अहमद जहाँअली मुल्ला, सुरेबुल उस्मान शेख, तुहीन रुपचाट शेख, बिशाल जगस बडगी, शिरयत फजुल मंडल, सम्राट शिराजुल इस्लाम, मीनल मुमताज शेख, प्रदीप ठोंबरे यांच्यासह १२ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार आंधळकर याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आंधळकर, खुडे, नाईक हे बिबवेवाडीतील एस. के. बार अँड रेस्टोरंटमध्ये गेले होते. मद्यालयातील बिल देण्यावरुन त्यांचा बारमधील कामगारांशी वाद झाला. त्यानंतर आंधळकर, खुडे, नाईक यांना बारमध्ये २० ते २५ मिनिटे कोंडून ठेवण्यात आले. त्यांना कामगारांनी बांबूने बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे तपास करत आहेत.
व्हिडीओ प्रचंड व्हायरल
शांतताप्रिय पुण्यातील गुन्हेगारी कमी होत नसता नव्याने गुन्हेगारीचे केंद्र बनलेल्या बिबवेवाडीत ‘बार वाल्यां’ची गुंडागर्दीचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. बिलावरून ३ तरुणांना कामगार व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणांनी प्रचंड मारहाण केली. धक्कादायक म्हणजे, बारच्या कामगारांसोबत बाहेरच्या मुलांना बोलवून मारहाण का केली गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे. मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो पाहून सर्वसामान्याचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही.
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.