सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : पोलिस ठाण्यासमोरच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे एक पोलिस अंमलदराला चांगलेच महागात पडले आहे. बुधवारी ( दि. ५) रात्री बाराच्या दरम्यान सांगवी पोलीस ठाण्यासमोर काही तरुणांनी पोलीस अंमलदराचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. याचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून सर्वांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केले. मात्र, ही बाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित तीन पोलीस अंमलदारांना निलंबित केले. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला नियंत्रण कक्षाला संलग्न केले आहे.
सांगवी पोलिस ठाण्यासमोर बुधवारी रात्री बारा वाजता ही घटना घडली. वाढदिवस असणारे पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तर, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाला संलग्न करण्यात आले आहे.
ड्रोनद्वारे केले चित्रीकरण
गुरुवारी (दि. ६) पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त बुधवारी (दि. ५) रात्री बारा वाजताच त्यांचे काही मित्र सांगवी पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘दादा’ लिहलेला दुमजली केक कापण्यात आला. त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर समाजातील विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली. याची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह, चार पोलिस अंमलदारांवर कारवाई केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्यासमोर मध्यरात्री पोलिस कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे.
– विशाल हिरे,सहाय्यक पोलिस आयुक्त