crime (फोटो सौजन्य- pinterest)
मुंबई: राज्यात बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक उपाय योजले जात आहेत. तर दुसरीकडे महिला व मुलींच्या सुरक्षिततेविषयी हाकाट्या सुरू असल्या आणि त्यासाठी कडक कायदे करण्याची भाषा बोलली जात असली तरी नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेली बालक आणि स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची आकडेवारी धक्कादायक आहे. सन २०२४ मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या २२ हजार ७५८ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. तर याच वर्षात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ४६ हजार ४५९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही आकडेवारी नुसती चिंता वाढवणारी नाही तर बालक आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही
मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा, बाल संरक्षण युनिट्स, बालकल्याण समित्या, जनजागृती यासारख्या अनेक उपाययोजना शासन स्तरावरून होत असताना देखील बालकांवरील होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ व्हावी ही बाब चिंताजनक आणि अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करणारी आहे. सन २०२३ मध्ये राज्यातील बालकांवरील झालेल्या गुन्ह्यांची नोंदवलेली संख्या २१ हजार ८०२ इतकी असताना सन २०२४ मध्ये ती संख्या वाढवून २२ हजार ५७८ इतकी झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. खुनाचे गुन्हे २०२३ मध्ये ८४ होते ते २०२४ मध्ये ११ ने वाढून ९५ इतके झाले. तर अर्भक हत्या सहा वरून अकरावर पोहोचल्या. सन २०२३ मध्ये बालकांवरील अत्याचाराचे ४५९४ इतके गुन्हे नोंदविले गेले. ती संख्या २०२४ मध्ये वाढून ४६५० वर पोहोचली. अपहरण व पळवून नेण्याचे गुन्हे २०२३ मध्ये १२ हजार ५६४ होते ते २०२४ मध्ये १२६७१ इतके नोंदविण्यात आले. तर इतर प्रकारचे गुन्हे जे २०२३ मध्ये ४५०३ नोंदविण्यात आले त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन ५१०३ इतके नोंदविण्यात आले.
नातेवाईकांकडून क्रूर कृत्ये
राज्यातील स्त्रियांना त्यांच्या सर्व मूलभूत हक्कांची शाश्वती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक जनजागृती व जाणीव वृद्धिंगत करण्याबरोबरच फौजदारी न्याय व्यवस्थेकडून कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराचे ४६ हजार ४५९ गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये बलात्कार ७ हजार ९४०, अपहरण व पळवून नेणे ८८३ गुन्हे, हुंडाबळी १३९, पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये १० हजार ५३९ गुन्हे, विनयभंग व लैंगिक छळ १७ हजार ६७१, अत्याचार १५९ तर अनैतिक व्यापार व इतर ११२८ गुन्ह्यांची नोंद २०२४ मध्ये करण्यात आली. सन २०२३ च्या मानाने या अत्याचाराच्या संख्येत काहीशी घट दिसत असली तरी मागील तीन-चार वर्षांच्या आकडेवारीवरून नजर टाकल्यास हे अत्याचाराचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे.