फोटो सौजन्य - Social Media
वसई । रविंद्र माने: माणिकपुर-वसई येथील मयंक ज्वेलर्सच्या वृध्द मालकाला पिस्टलच्या सहाय्याने मारहाण करुन ७१ लाखांचे दागिने लुटल्याप्रकरणाचा गुन्हे शाखेने छडा लावत पाच जणांच्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. माणिकपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौल हेरिटेज सिटीमध्ये असलेल्या मयंक ज्वेलर्सवर १० जानेवारीला रात्री सव्वा नऊच्या सुमारास धाडसी दरोडा टाकण्यात आला होता.यावेळी दुकानात रतनलाल सिंघवी (६९) हे वृध्द मालक एकटेच असतांना २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवून आणि पिस्तुल डोक्यात मारुन ९४९,५५० ग्रॅम वजनाचे सुमारे ७१ लाखांचे दागिने लुटून नेले होते.या धाडसी दरोड्यात मालक गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३०९ (६), ३५१ (२), ३ (५), ६१ (२) कलमांसह सह शस्त्र अधिनियम कलम ३.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दरोड्याचा तपास करण्यासाठी माणिकपुर आणि वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळापासून तब्बल ६०० हून अधिक ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासले.त्यावेळी दरोड्यानंतर सदर चोरटे दुचाकीने उत्तर वसईतील गिरीज-टोकपाडा परिसरात जातांना दिसून आले.तसेच टोकपाडा परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये ते एका बिल्डींगमध्ये जातांना दिसून आले.त्यामुळे टोकपाडा परिसरात पोलीसांनी बातमीदारांचे जाळे पसरल्यावर या बिल्डींगचा मालक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली.
त्यामुळे त्याचा मोबाईल ट्र्रॅक करुन आणि सापळा रचून अनुज गंगाराम चौगुले,रॉयल ऊर्फ रॉय एडवार्ड सिक्वेरा या दोघांना अटक करण्यात आले.सदर दरोडा टाकण्यासाठी त्यांनी सातारा येथून चोरलेल्या पल्सर मोटारसायकलचा वापर केल्याचे आणि या गुन्ह्यात लालसिंग ऊर्फ सिताराम सर्जेराव मोरे,सौरभ ऊर्फ पप्पु तुकाराम राक्षे हे साथीदार सहभागी असल्याची कबुली दिली.त्यानंतर मोरे आणि राक्षेला सातारा येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली.तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिने खरेदी करणारा अमर भारत निमगिरे याला कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणातील काही आरोपींवर यापूर्वी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली.या टोळीकडून २३ लाख, ३९ हजार रुपये किंमतीचे दागिने,१ पिस्टल,१ जिवंत काडतुस,पल्सर मोटारसायकल,कोयता,कटर,कटावणी आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
अनुज गंगाराम चौगुले याच्याविरोधात ताडदेव,खार,विक्रमगड,भायखळा,सी.बी.डी. सी.आय.डी पोलीस ठाण्यात एकेक,कोयना नगर,मरिन ड्राईव्ह,आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोन-दोन,मलबार हिलमध्ये-३ आणि कफ परेड पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल आहेत.तर रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरावर महाबळेश्वर,माणिकपुर,लोणंद,डोंगरी,कोयनानगर,नवघर,व्ही.पी.रोड पोलीस ठाण्यात एकेक, सी.बी.डी.सी.आय.डी पोलीस ठाण्यात दोन आणि पंत नगर पोलीस ठाण्यात तिन गुन्हे यापुर्वी दाखल आहेत.लालसिंग ऊर्फ सिताराम सर्जेराव मोरेवर सातारा तालुका,कोयना नगर आणि सातारा शहरात एकेक गुन्हे दाखल आहेत.त्यांच्याकडून वाई आणि सातारा शहरात केलेले गुन्हे गुन्हे शाखेने उघड केले आहेत.
पोलीस उपायुक्ता पोर्णीमा चौगुले- श्रिंगी यांच्या मार्गदर्शनाखाली माणिकपुर आणि वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन सानप,उपनिरिक्षक सनिल पाटील,हवालदार शैलेश पाटील,शामेश चंदनशिवे,धनंजय चौधरी,किरण म्हात्रे,सचिन दोरकर,सतिश गांगुळे,बाळु कुटे,गोविंद लवटे,आनंदा गडचे,प्रचिण कांचे,विनायक राऊत,सचिन लांडगे,केतन गोडसे,भालचंद्र बागुल,अमोल बडे यांनी ही कामगिरी केली.