संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात पादचारी महिला व ज्येष्ठ महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावणाऱ्या तसेच बतावणीने त्यांच्याकडील दागिने लांबविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला आहे. सलग दोन दिवसात शहरात ८ घटना घडल्या असून, या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांना आवर घालण्यात पोलीस अपयशी पडत आहेत.
गुरूवारी वेगवेगळ्या दोन घटनेत ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. रविवार पेठ व सदाशिव पेठेत घटना घडल्या. याप्रकरणी ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार शनिवार पेठेत राहायला आहेत. गुरूवारी सकाळी साडे सातच्या सुमारास त्या श्री महावीर जयंती निमित्ताने रविवार पेठेतून दर्शनासाठी जात होत्या. तेव्हा दुचाकीवर पाठिमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेली. महिलेने आरडाओरडा केला. पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी येथे धाव घेतली. सीसीटीव्हीची पडताळणी करून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.
दुसऱ्या घटनेत सदाशिव पेठेतील राणा प्रताप उद्यानाजवळ गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेत राहायला आहेत. दररोज सकाळी राणा प्रताप उद्यान परिसरातफ फिरायला जातात. नेहमीप्रमाणे त्या सकाळी फिरायला गेल्या असता उद्यानाजवळ दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील ७० हजार रुपयांचे दागिने हिसकावून पळ काढला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे करत आहेत.
पीएमपी प्रवासी तरुणाचा मोबाइल चोरी
पीएमपी प्रवासी तरुणाकडील मोबाइल चोरून नेल्याच्या घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याबाबत पिंटू इंद्रेशकुमार पटेल (वय २६, रा. आंबेगाव) यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. पिंटू कामानिमित्त चाकणमध्ये स्थायिक झाले आहेत. तो मूळचा परगावातील आहे. पुणे स्टेशन परिसरातून तो पीएमपी बसने चाकणकडे निघाला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला.
पोलीस असल्याची बतावणी करून चोरी
पोलीस असल्याच्या बतावणीने चोरीच्या दोन घटना घडल्या. ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नाना पेठेत जात असताना दोघांनी त्यांना थांबविले व अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगत हातचालाखीने सोनसाखळी चोरून नेली. मुळा रोड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. दुसरी घटना विश्रांतवाडी चौकात घडली. ६० वर्षीय व्यक्ती नळ स्टॉप येथे येत होते. तेव्हा दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. पोलिस असल्याची बतावणी केली. ‘या परिसरात चोरीची घटना घडली असून, चोरीला गेलेले दागिने तुमच्या अंगावरील दागिन्यांसारखे दिसत आहेत. ते आम्हाला तपासावे लागतील,’ असे म्हणून २ लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
जंगली महाराज मंदिराच्या दारातून साखळी पळविली
जंगली महाराज मंदिरात भजनासाठी आलेल्या ६३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २ लाख ४० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आल्या असता मागून आलेल्या चोरट्याने गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
दिशाभूल करून दागिने पळविले
खडक परिसरातील नेहरू रस्त्यावर सोनावणे रुग्णालयासमोर ५५ वर्षीय महिलेची दिशाभूल करून कानातील सोन्याचे टॉप्स व वेल चोरून नेले. ‘या परिसरात चोरटे आहेत. ते महिलांचे दागिने चोरतात. तुम्ही दागिने काढून सुरक्षित ठेवा,’ असे सांगून चोरट्याने हातचालाखीने महिलेचे दागिने चोरून नेले. तर, हडपसर येथे एका तरुणाला पैसे मोजायला देऊन त्यांचे लक्ष गुंतवून ठेवले आणि चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी व पैसे घेऊन पळ काढला.
मारहाण करून सोनसाखळी हिसकावली
खराडी मुंढवा रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणाला मारहाण करून गळ्यातील सोसाखळी हिसकावून तोडून नेली. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून खराडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.