संग्रहित फोटो
वडगाव मावळ/ सतिश गाडे : मावळ तालुक्यातील उर्से गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी शिरगाव पंधरवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात समीर कुमार मंडळ (वय ३० मुळ गाव झारखंड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मूळचा झारखंड राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं घटना काय घडली?
शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली. रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मुलीचे वडील गेल्या आठ दिवसांपासून कामानिमित्त पुण्यात होते, तर आई जवळच्या कंपनीत काम करते. त्यामुळे अनेकदा ही चिमुकली घरात एकटीच राहत होती.
या परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने घराजवळील परिसरातच काही अंतरावर मुलीला नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून देण्यात आली आहे.
रात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल
या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शिरगाव पंधरवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे काही तासांतच आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
परिसरात तीव्र संताप
या घटनेनंतर उर्से गावासह संपूर्ण मावळ तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरगाव पंधरवडी पोलीस करत असून, आरोपीविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






