संग्रहित फोटो
पुणे : राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातून लुटमारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाकूच्या धाकाने दुचाकीस्वार तरुणाला अडवून दोन अल्पवयीन साथीदारांसह मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे. हा प्रकार लोहगावमधील फॉरेस्ट पार्क परिसरात घडला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी संतोष किसन राठोड (वय २१) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लोहगावमधील फॉरेस्ट पार्क परिसरात राहायला आहे. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण लोहगावमधील फॉरेस्ट पार्क रस्त्याने निघाला होता. फॉरेस्ट पार्क परिसरात दुचाकीवरुन आलेला चोरटा राठोड आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनांनी तरुणाला अडवले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्या पाकिटातील रोकड काढून घेतली. चोरट्यांच्या मारहाणीत तरुण जखमी झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक अजय संकेश्वरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या राठोड याला पकडले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.