संग्रहित फोटो
पुणे : भरधाव कारने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना गुलटेकडीतील उड्डाणपुलावर घडली आहे. अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या दाम्पत्याला मदत न करता चालक पसार झाला आहे. याप्रकरणी कारचालकावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रकाश बाफना (वय ५८, रा. भूमीव्हिला सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश बाफना, त्यांची पत्नी व मित्र सहकुटुंब शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री टिळक रस्त्यावरील उपाहारगृहात गेले होते. तेथून बाफना दाम्पत्य दुचाकीवरुन रात्री साडेदहाच्या सुमारास घरी निघाले होते. गुलटेकडी ते मार्केट यार्ड दरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर भरधाव कारने दुचाकीस्वार बाफना यांना धडक दिली. बाफना दाम्पत्य रस्त्यात पडले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता, तसेच बाफना दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक भरधाव वेगात पसार झाला.
अपघातानंतर बाफना दाम्पत्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बाफना यांना गंभीर दुखापत झाली. त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या मोटारचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस नाईक विनोद धामणगावकर अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ‘या’ भागातून रोकड अन् सोनसाखळी हिसकावले
महिला पोलिसाला कारने उडवले
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलीस ‘अॅक्शन मोडवर’
बेशिस्त वाहन चालकांमुळे देखील या वाहतूक कोंडीत भर पडते. तर अपघाताला देखील निमत्रंण मिळते. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ट्रिपलशिट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणारे तसेच मोबाईल टॉकिंग अशांवर जोरदार कारवाई सुरू केली. वाहने देखील जप्त करण्यात येत होती. नंतर आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. आता थेट पोलिसांनी बेशिस्तांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात असून, यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्याची मोहिम हाती घेतली आहे. यात धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांसह रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर प्रामुख्याने कारवाई केली जात आहे, असे दाखल गुन्ह्यांचे विश्लेषण केल्यावर दिसून येते.