उंब्रज परिसरात तब्बल 25 लाखांचा लाकूड साठा जप्त; सातारा वनविभागाचे चार ठिकाणी छापे
सातारा : सातारा वनविभागाच्या संरक्षण आणि अतिक्रमण निर्मूलन व विभागीय वन अधिकारी दक्षता कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने उंब्रज परिसरातील चार ठिकाणी छापे मारून तब्बल 25 लाख 27 हजार 872 रुपयाचा लाकूडफाटा जप्त करण्यात आला. मौजे उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे आणि कोर्टी या चार ठिकाणी धाड मारून साग आणि रायवळ प्रजातीच्या लाकडाचे १२८३ नग व इतर लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे .
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी दक्षता कोल्हापूर संजय वाघमोडे, वनक्षेत्रपाल संरक्षण अतिक्रमण निर्मूलन गणेश महांगडे, कराडच्या वनपरिक्षेत्राधिकारी ललिता पाटील, वनविभाग सातारा वनपाल आनंद जगताप, सचिन खंडागळे, के के जाधवर, रामेश्वर घुले, अश्विनी नागवे, इत्यादी कर्मचाऱ्यांनी दक्षता पथकाच्या गोपनीय माहितीच्या आधारे उंब्रज परिसरामध्ये चार ठिकाणी छापे मारले.
यामध्ये 98.49 घनमीटर असलेला एकूण 1283 साग व रायवळ प्रजातीचे अनगड नग जप्त केले आहेत. कळंत्रे वाडी व शिवडे येथे ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूड माल जप्त करण्यात आला. या चार कारवायांमध्ये भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 नुसार तीन वन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा लाकूड फाटा कोठून आणण्यात आला, याविषयीची अधिक माहिती दक्षता पथकाकडून घेतली जात आहे.
हेदेखील वाचा : बनावट ॲप्सपासून सुरक्षित रहा! योग्य मार्गदर्शन आवश्यक, काय आहे APK Files
अवैध वृक्षतोड करून त्याची वाहतूक करणे हा भारतीय वन अधिनियम 1927 च्या कायद्यानुसार गुन्हा असून, सदर गुन्ह्यास एक वर्षापर्यंतचा कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशा शिक्षेचे प्रावधान आहे. नागरिकांनी अशा स्वरूपाची वृक्षतोड अथवा साठा लक्षात आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते वनविभाग सातारा यांनी केले आहे .
हेदेखील वाचा : LPG Gas Booking : एलपीजी सिलिंडर बुक करत आहात का? मग ‘या’ सोप्या पद्धतीने करा झटपट बुकींग






