(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘अनुपमा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. स्टार प्लस वरील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून ओळखली जाणारी ही मालिका आपल्या रंजक कथानक, भावनिक प्रसंग आणि सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे आजही टीव्हीवर आपली मजबूत पकड कायम ठेवून आहे. मालिकेतील पात्रे आणि त्यांचे संघर्ष प्रेक्षकांना इतके जवळचे वाटू लागले आहेत की, अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कथेशी भावनिकरीत्या जोडले गेले आहेत.
सध्या मालिकेच्या कथानकात एक मोठा लीप दाखवण्यात आला असून त्यानंतर अनुपमा तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करताना दिसणार आहे. या नव्या टप्प्यात ती गोव्यात नवे आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुपमा गोव्याच्या सुंदर बीचवर थेपले आणि ढोकळे विकत आपली नवी सुरुवात करताना दिसणार आहे. हा साधा पण आत्मविश्वासपूर्ण प्रवास तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची झलक दाखवतो.
‘धुरंधर’मधील रणवीर सिंहच्या अभिनयाची चर्चा; ‘धुरंधर: द रिवेंज’साठी वाढली प्रेक्षकांची उत्सुकता
या प्रोमोमध्ये तिच्यासोबत राहणाऱ्या एका छोट्या मुलीसोबत अनुपमाचे जिव्हाळ्याचे नातेही दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट म्हणजे अभिनेता सचिन त्यागी यांची एन्ट्री होणार आहे. त्यांच्या भूमिकेमुळे अनुपमाच्या आयुष्यात नवे वळण येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच त्यांचे चाहते त्यांना पुन्हा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली गांगुली यांनी या नव्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की, “अनुपमा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. ही अशी स्त्री आहे जी आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी पुन्हा उभी राहण्याची ताकद दाखवते. तिच्या प्रवासात अनेक महिलांच्या आयुष्यातील अनुभव आणि संघर्ष दिसून येतात. प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असतो काहींना अनुपमाचा आधीचा प्रवास आपला वाटतो, तर काहींना पुढे येणारा प्रवास स्वतःसारखा भासतो.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “अनुपमाची जिद्द, स्वतःच्या किमतीची जाणीव आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची तिची वृत्ती खरोखर प्रेरणादायी आहे.”
‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’च्या मंचावर घुमणार मराठीचा हुंकार; गाजणार मराठीचा सन्मान!
लीपनंतरच्या कथानकाबद्दल बोलताना रुपाली गांगुली यांनी सांगितले की, “प्रार्थनाच्या मृत्यूनंतर आता कथा नव्या वळणावर येते आहे. अनुपमा गोव्यात देविकाच्या मुलीसोबत राहत आहे आणि नव्या जबाबदाऱ्यांना सामोरी जात आहे. त्याचबरोबर मालिकेत एक नवी एन्ट्री आणि अनेक अनपेक्षित ट्विस्टही पाहायला मिळणार आहे.”
आता लीपनंतर अनुपमाचा हा गोवा अध्याय प्रेक्षकांना कोणते नवे वळण दाखवणार, सचिन त्यागींची एन्ट्री कथेला कसा रंग देणार आणि अनुपमा पुन्हा एकदा स्वतःच्या ताकदीवर नवे आयुष्य कसे उभे करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी भागांमध्ये भावना, संघर्ष आणि प्रेरणादायी क्षणांची मालिका पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






