संग्रहित फोटो
कुरुंदवाड : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना थांबताना दिसत नाही. दररोज वेगवेगळ्या कारणावरुन खून, हाणामारीच्या घटना घडतात. गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांची चिंता वाढत आहे. अशातच आता शिरोळ तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या मित्रांनाच कोयत्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाळासो शामराव देसाई (वय ३७, रा. नदीवेस दत्तवाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाल्मिकी घडसे (कोळी, रा. बाळासाहेब मानेनगर, दत्तवाड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित आरोपी हे एकाच गावातील मित्र असून, काही दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी फिर्यादी बाळासो देसाई हे आपल्या मित्रासह सुनिल कुमार मगदुम याला घेऊन आरोपीच्या घरी का कानशिलात मारली होती? असा जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपीने दारूच्या नशेत संतापून घरातील उस तोडायचा कोयता उचलला आणि दोघांवर हल्ला केला.
या हल्ल्यात सुनिल मगदुम यांना गंभीर जखमी केले आहे, तर फिर्यादी बाळासो देसाई यांच्या पाठीवर, खांद्यावर आणि कानामागे कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींना तात्काळ इचलकरंजी येथील आय.जी.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पवार यांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे करीत आहेत.
हॉटेलमध्ये वेटरकडून ग्राहकावर हल्ला
मावळ तालुक्यातील जांभूळ गावात जुने मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या सनराईज हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाल्याचे उघडकीस आले आहे. दोन वेटरनी ग्राहक आणि त्याच्या मुलावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन अज्ञात वेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास जांभूळ गावाच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सदानंद संजु चौधरी (वय ५०, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. गावठाण, कामशेत) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.