संग्रहित फोटो
तासगाव : लोढे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने चिडून जाऊन सरपंच व त्यांच्या साथीदारांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी प्रकाश भगवान ठोंबरे (वय ४१) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सरपंचांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यात सरपंच विलास आनंदा पाटील, कुमार तुकाराम पाटील, संदीप तुकाराम पाटील, सत्यवान भगवान पाटील व संदीप बाळू पाटील या सशयितांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोंढे ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी फिर्यादी प्रकाश ठाेंबरे यांनी गावात वाळू तस्करी करून आणली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला. गावातील जमीन अतिक्रमण, गावातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वीज कनेक्शन देण्यासाठी मदत करणे व इतर कारणांवरुन सरपंच विलास पाटील जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी ग्रामसभेत केली. याचा राग सरपंच विलास पाटील व अन्य संशयितांना आला. यातून चिडून जाऊन सरपंच व त्यांच्या साथीदारांनी दिनांक २७ रोजी लोढे ग्रामपंचायतीसमोर ठाेंबरे यांना दमदाटी, शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.