गुंतवणुकीतून ज्यादा पैशांचे आमिष दाखवले अन् तरुणाला तब्बल 53 लाखांना लुटले; व्हॉट्सऍपवर 'तो' मेसेज आला अन्...
चित्रपटाला शोभावा असा गुन्हेगारी कट उघडकीस आला आहे. एका अदृश्य चेहऱ्याने रचलेल्या ‘हनी-मनी ट्रॅप’च्या जाळ्यात अडकून एका तरुणाला तब्बल ५२ लाख ९३ हजार २२८ रुपयांचा चुना लागला आहे. ‘सानवी खुराना’ नावाच्या एका प्रोफाईलने आधी प्रेमाचे नाटक केले आणि नंतर गुंतवणुकीच्या नावाखाली या तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हनी-मनी ट्रॅप प्रकरणाची सुरुवात एका व्हॉट्सअॅप मेसेजने झाली. संशयिताने ‘सानवी खुराना’ या नावाने फिर्यादी तरुणाशी संपर्क साधला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे आमिष दाखवून तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, सानवीने त्याला एका बनावट क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते उघडण्यास भाग पाडले. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास तुला कोट्यवधींचा नफा मिळेल, असे स्वप्न त्याला दाखवण्यात आले. फिर्यादीने सुरुवातीला काही पैसे गुंतवले, तेव्हा त्याला स्क्रीनवर चक्क कोटी रुपयांचा नफा दिसत होता. हा आकडा पाहून तो अधिकच भुलला. मात्र, हा नफा काढण्यासाठी संशयिताने कधी ‘ट्रेडिंग कमिशन’ तर कधी ‘टॅक्स’च्या नावाखाली तरुणाकडून वेळोवेळी पैसे उकळले.
दरम्यान, हा नफा मिळवण्याच्या नादात तरुणाने फायनान्स आणि बँकेच्या विविध खात्यांतून तब्बल ५३ लाख रुपये संशयितांच्या हवाली केले. जेव्हा तरुणाने आपली मूळ रक्कम आणि झालेला नफा परत मागितला, तेव्हा ‘सानवी’चा खरा चेहरा समोर आला. तिने पुन्हा ३४ लाख रुपयांची मागणी केली.
दुसरा मोठा ‘हनी ट्रॅप’ उघड
नाशिकमध्ये ‘हनी-मनी ट्रॅप’चा हा दुसरा मोठा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वीच ‘तानिया शर्मा’ नावाच्या तरुणीने व्यावसायिकाला ४८ लाखांना लुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सानवी खुराणाचे हे ५३ लाखांचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांनी संबंधित बँक खाते क्रमांक आणि सोशल मीडिया प्रोफाईलविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आभासी नफ्याचे फसवणारे ‘मायाजाल’
तरुणाने पैसे देण्यास नकार देताच, संमतीने शेअर केलेले नग्न फोटो आणि खाजगी व्हिडिओ त्यालाच पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन आणि तुला संपवून टाकेन, अशी धमकी देण्यात आली.
हेदेखील वाचा : Paper Leak: धक्कादायक! पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर लीक, टेलिग्राम ग्रुपवर तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल; गुन्हा दाखल






