संग्रहित फोटो
पुणे : शनिवारवाडा परिसरात एका पादचारी ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी ९० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांवर दाखल केला आहे. याबाबत ६३ वर्षीय ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांची विवाहित मुलगी प्रभात रस्ता परिसरात राहायला असून, त्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. शनिवारवाडा परिसरातील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाजवळ चोरट्याने त्यांना अडवले. तुमची वस्तू रस्त्यावर पडली आहे का ?, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. महिलेने चोरट्याकडे दुर्लक्ष केले.
काही अंतरावर चोरटा आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराने त्यांना अडवले. त्यांना सोन्यासारख्या धातूची पट्टी चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. स्वस्तात सोन्याची पट्टी देतो, असे सांगून चोरट्यांनी महिलेकडील मंगळसूत्र आणि ५०० रुपये काढून घेतले. चोरटे तेथून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक; तब्बल 80 लाखांना घातला गंडा
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिलेच्या पर्समधून सव्वा लाखांचे दागिने चोरले
खडकी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख २७ हजारांचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पैसे देण्यासाठी पर्स काढल्यानंतर ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.