संग्रहित फोटो
पुणे : कोंढवा भागात दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याची दुचाकी स्लीप होऊन अपघात झाल्यानंतर दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन साखळी तसेच दुचाकीची चावी काढून पोबारा केल्याची घटना घडली आहे. चालत्या दुचाकीवरून चोरी, अडवून लुटमार तसेच पादचाऱ्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या जात असताना आता अपघातानंतर देखील लुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
मदतीच्या बहाण्याने त्यांना बोलून लुटले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास ही घटना टिळेकरनगर येथील श्रीराम चौकात घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांची पत्नी कोंढवा बुद्रुक येथे राहण्यास आहेत. रात्री दहाच्या सुमारास ते कामानिमित्त बाहेर गेले होते. तेथून ते घरी निघाले होते. टिळेकरनगर येथील श्रीराम चौकात एका खड्यात त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यात ते खाली पडले. तेव्हा त्यांना मदतीच्या बहाणा करून दोघेजन त्यांच्याजवळ आले. मात्र, त्यांनी गळ्यातील सोन साखळी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
महिलेची हातातील बांगडी चोरली
कात्रज बस स्टॉप ते येवलेवाडी पीएमटीने प्रवास करणाऱ्या महिलेच्या हातातील ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत ५७ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून, चोरट्यांनी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
मेडिकल फोडून रोकड चोरली
कर्वे रस्त्यावरील एक बंद मेडिकल फोडून चोरट्यांनी गल्यातील १ लाख २८ हजारांची रोकड चोरून नेली. डेक्कन पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार थेरगावमधील आहेत. त्यांचे गरवारे कॉलेजसमोर मेडिकल आहे. ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटवून गल्यातील रोकड चोरून नेली. अधिक तपास पोलीस करत आहेत.