संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात चोऱ्या अन् घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांकडून धुमाकूळ घातला असल्याचे दिसत असून, कात्रजमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अभिजित विठ्ठल झाडे (वय २६, रा. वाघजाईमाता अपार्टमेंट, वाघजाईनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला आहे. झाडे सायंकाळी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.
उघड्या दरवाजातून साडे पाच लाखांचे दागिने चोरीला
हडपसरमधील मांजरी बुद्रुकमध्ये अज्ञाताने नजर चुकवून कपाटातून तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे. कुटूंबिय घराच्या शेजारी वाढदिवस साजरा करत होते. त्याची संधी साधत चोरट्यांनी हे दागिने चोरून नेले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सचिन टिळेकर (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. टिळेकर यांच्या कुटूंबात एकाचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी सर्व कुटूंब एकत्रित जमले होते. घराच्या बाजूलाच वाढदिवस साजरा करण्यात येत होता. घरातील व्यक्ती त्याठिकाणी गेल्या असता अज्ञाताने हे दागिने चोरून नेल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड; कोयते उगारले अन्…
पुण्यात नागरिकांना लुटले
पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.