आंघोळ करतानाचे 'ते' फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर...
भोकरदन : जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरात एका तरुणीवर तब्बल नऊ वर्षे अत्याचार करून तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच गुरूवारी संतप्त जमावाने आरोपीच्या घराला आग लावल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती अल्पवयीन असताना आरोपीने तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या माध्यमातून आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. पुढे तिला धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, विविध सामाजिक संघटनांनीही आरोपींवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या भावाला अटक केली आहे. तपासादरम्यान पीडितेच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी आरोपीच्या घरासमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले, “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत संतप्त जमावाने निषेध व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर काही अज्ञात व्यक्तीनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर घराला आग लावण्यात आली. आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल
सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ नितीन कटेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक नेमाने यांनी पाहणी करून गावकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना कायदा भंग होणार नाही, याची देखील माहिती देऊन सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या सदर आरोपीचे घर जाळण्याच्या घटनेप्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
हिंदू धर्म विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन
हिंदू धर्म विराट आक्रोश मोर्चा धर्म आणि सन्मान रक्षणासाठी वालसावंगी येथे लैंगिक शोषण व महिला अत्याचार धर्म बहिणीवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराबद्दल लैंगिक शोषण, लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन व त्या आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी हनुमान मंदिर वालसावंगी येथे गावकऱ्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
या संपूर्ण घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग, मानसिक छळ आणि जबरदस्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिता व्यक्त केली जात आहे. पीडित तरुणीला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






