(फोटो सौजन्य: istock)
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऑन्कोलॉजी नेटवर्कचे क्लिनिकल हेड डॉ. हरित चतुर्वेदी यांनी सांगितले की, अंडाशयाच्या कर्करोगाला ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते. याच्या सुरुवातीची लक्षणे फार साैम्य असतात ज्यामुळे ती लगेच ओळखून येत नाहीत. त्यांनी सांगितले की, महिलांनी पोटातील सततच्या वेदनांकडे दुर्लक्षित करु नये आणि वेळेवर तपासणी करुन यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. तज्ञांच्या मते, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन, तणाव आणि नियमित आरोग्य तपासणीचा अभाव ही या आजाराची काही प्रमुख कारणे आहेत. भारतात दरवर्षी ओवेरियन कँसरची सुमारे ४७ हजार नवीन प्रकरणे समोर येतात तर दिल्लीत २२०० महिलांना याचा त्रास सतावत आहे.
डाॅक्टरांनी सांगितले की, या आजाराचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे याच्या सुरुवतीच्या टप्प्यातच याचे निदान न होणे. पोटदुखी , गॅस, पोट फुगणे किंवा भूक न लागणे यांसारख्या साैम्य लक्षणांना महिला दुर्लक्षित करत असल्याने या आजाराचे निदान होत नाही आणि हळूहळू आजार आणखी वाढू लागतो. यामुळेच साैम्य वाटणाऱ्या या समस्या जर महिलांना वारंवार जाणवत असतील तर त्यांनी योग्य वेळी डाॅक्टरांना भेट देऊन यावर उपचार घ्यायला हवेत. वेळेत घेतलेले उपचार आजाराचा धोका कमी करण्यास मदत करते.
ओवेरियन कँसर म्हणजे काय?
ओवेरियन कँसर हा महिलांना जाणवणारा गंभीर आजार आहे. यात अंडाशय शरीरात अंडी तयार करतात. जेव्हा तेथील पेशींची वाढ असमान्यपणे होऊ लागते तेव्हा याचे कर्करोगात रुपांतर होऊ लागते. हा आजार वाढते वय, कौटुंबिक इतिहास, हार्मोनल बदल, लठ्ठपणा आणि अयोग्य जीवनशैली अशा अनेक घटकांमुळे होऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






