सफाई कामगाराला 20 हजारांची लाच मागणं वरिष्ठ लिपिकाला भोवलं; 'एसीबी'ने जाळ्यात पकडलं (संग्रहित फोटो)
पुणे : पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे जितका वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली.
पाणी मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे आणि कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर आशा कानिफनाथ चौपाली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदारांचे पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात आहे. ते नियमितपणे म्हणजे जितका वापर होईल तितके बील काढण्यास गेले होते. तेव्हा पाणी मीटर निरीक्षक विकास गव्हाणे यांनी स्वत:साठी १ हजार रुपये व कॉम्प्युटर ऑपरेटर आशा हिच्यासाठी ६०० रुपये असे १ हजार ६०० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता आशा चौपाली हिने त्यांच्याकडे पाणीपुरवठ्याचे बील नियमित करुन देण्यास स्वत:साठी ६०० रुपये व विकास गव्हाणे याच्याकरीता १ हजार रुपये असे १ हजार ६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीने सापळा कारवाईत ह प्रभाग कार्यालयात १ हजार ६०० रुपये स्वीकारताना अशा चौपाली हिला पकडले. नंतर आशा चौपालीने विकास गव्हाणे याला त्यांच्यासाठी तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या लाच रक्कमबाबत फोन वरुन विचारले असताना विकास गव्हाणे याने त्याच्यासाठी स्वीकारलेली रक्कम आशा चौपाली हिच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास करीत आहेत.
पाच हजारांची लाच घेताला पकडले
दरम्यान पुण्यात लाच घेतल्याचे अनेक प्रकार आत्तापर्यंत उघडकीस आले आहेत. गेल्या काही दिवसाखाली अपघात प्रकरणात कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पुनावळे येथे करण्यात आली आहे. ज्ञानदेव तुकाराम बगाडे (वय ४४) असे लाच घेणाऱ्या पोलिसाचे नाव असून ते रावेत पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे व्यापारी असून तक्रारदार यांच्या मुलाचा आणि एका दुचाकीस्वाराचा पुनावळे येथे अपघात झाला होता. त्याबाबत एमएलसी झाल्यानंतर हवालदार बगाडे यांनी या अपघात प्रकरणी जबाब नोंदवून अपघात मिटवून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी बगाडे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी करून पुनावळेतील गंधर्व हॉटेलसमोर सापळा रचला. तसेच पाच हजारांची लाच घेताना बगाडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.