संग्रहित फोटो
शिक्रापूर : गणेशोत्सवाचे दिवस उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचे द्योतक मानले जातात. मात्र, विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे, डॉल्बी व लेझर लाईटच्या वाढत्या वापरामुळे ध्वनीप्रदूषण, अराजकता आणि अनुशासनभंगाचे प्रकार वाढत असल्याने पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर झाल्यास संबंधित गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांचे सर्व मंडळांना आवाहन
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ३५ गावांमध्ये तब्बल २४६ गणेश मंडळे कार्यरत आहेत. याशिवाय काही कंपन्या आणि खाजगी सोसायट्यांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या विसर्जनासाठी अनेक मंडळांनी मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले आहे. सर्व मंडळांनी विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण, वेळ व नियोजनाची माहिती पोलीस स्टेशनमध्ये सादर केली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गावागावांत जाऊन मंडळांना भेट देत आहेत. या वेळी त्यांनी मिरवणुका विहित वेळेत, शांततेत व नियमांचे पालन करून पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारंपारिक वाद्यांनाच प्राधान्य
पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकीत फक्त पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, लेझर लाईट वा डॉल्बीच्या जोरदार आवाजाने वातावरण बिघडवू नये. परंपरागत लेझीम, ढोल-ताशा, टाळ-मृदुंग यासारख्या वाद्यांमुळे गणेशोत्सवाची खरी ओळख जपली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
कायदेशीर कारवाईचा इशारा
“गणेशोत्सव हा भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव आहे. त्यामध्ये डीजे, डॉल्बी वा लेझर लाईटचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा ठाम इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
पुणे पोलीसही सज्ज
देशभरात यंदा गणपती मिरवणूकांचा जल्लोष पहायला मिळणार असून 6 सप्टेंबर रोजी शनिवारी गावोगावी आणि घरोघरी बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला जाईल .पुण्याच्या पारंपरिक गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे . मानाच्या पाच गणपती बाप्पासह इतर गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे . पुण्यात विसर्जनादिवशी होणाऱ्या गर्दीच्या पाश्वभूमीवर यंदा विसर्जनाच्या वेळा प्रशासनानं ठरवून दिल्या आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्कर्षबिंदू असलेली विसर्जन मिरवणूक यंदा ठरावीक वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांना नियमावली कळवण्यात आली असून यंदा शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने मिरवणूक पार पडावी यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.