संग्रहित फोटो
पुणे : बेशिस्त वाहन अन् अतिवेगात पुण्यात अपघाती मृत्यू वाढलेले असतानाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा.औंध) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नागरस रोड हॉटेल राहुल समोर भाले चौकाकडे जाणार्या रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, काळे हे दुपारी एकच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून नागरस रोडकडून भाले चौकाकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यातील खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली आणि त्यामुळे काळे हे दुचाकीवरून खाली पडले. यावेळी शेजारून निघालेल्या चारचाकी गाडीचे चाक काळे यांच्या डोक्यावरून गेले. गंभीर जखमी झाल्याने काळे यांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. काळे यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाऊस अन् खड्डे
पुणे शहरात महापालिकेकडून पावसाळापूर्व रस्त्यांची कामे झाली आहेत. डांबरीकरण तसेच खड्डे बुजवले गेले. पण, शहरात संततधार पाऊस व अधून-मधून मूसळधार पाऊस झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक भागात जीवघेणी परिस्थिती या खड्यामुळे निर्माण झाली आहे. पावसात खड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर ते वाहन चालकांना समजत देखील नाही. त्यातून मग अपघात होत असल्याचे वास्तव आहे.
औषधी आणण्यासाठी जाणं बेतलं जीवावर
पुणे जिल्ह्यातून एक अपघाताची घटना समोर आली आहे. औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर काळाने घाला घातला आहे. भरधाव मिक्सरखाली आल्याने ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (दि.१) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील पिके चौकात हा अपघात झाला आहे. पंडितराव माधवराव समर्थ (वय ६६, रा.बिजलीनगर,चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान घटनेनंतर मिक्सर चालक पसार झाला आहे.