संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : सांस्कृतिक आणि शिक्षणाच्या नगरीला गालबोट लावत बदनामी आणि शहराचे स्वस्थ बिघडवणाऱ्या नाईट लाईफ, पब व हायप्रोफाईल पार्ट्यांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात पुणे पोलिसांनी पुण्यात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या तब्बल ७०५ पेडलरांना दणका देत त्यांना जेरबंद केले आहे. कारवाईचा जोर वाढविला असला तरी पुण्यात कोकेन तसेच एमडी आणि गांजा या ड्रग्जचा पुरवठा येत असल्याचेच काही प्रकरणांवरून दिसत आहे. यातही गांजाची पाळेमुळे चांगली रोवली गेल्याचे दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षात ड्रग्ज पार्ट्यांमुळे तसेच उत्पादन व विक्रीमुळे पुणे चर्चेत राहत आहे. पबमधील पार्ट्यांत सहज उपलब्ध होत असलेला ड्रग्ज रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नोकरदार तरुणाई, उच्चभ्रू पोलिसांच्या पब कारवाईनंतर हाऊस पार्टीवर भर देऊ लागले आहेत. हे प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. पण, यामुळे पुण्याचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा पार्ट्यांसोबतच ‘पेडलर’ यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
गेल्या चार वर्षांत पुणे पोलिसांनी कारवाईत तब्बल ७०५ ड्रग ‘पेडलर्स’ना अटक केली आहे. मात्र, मोठी कारवाई करून देखील ड्रग्जचा पुरवठादार असलेली साखळी मोडता आलेली नाही. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर पेडलर आता शहराच्या बाहेरून ड्रग्जचा पुरवठा पुण्यात करत असल्याचे सांगितले जाते. मुंबई तसेच इतर शहरांमधून ड्रग्ज येत असल्याचे काही प्रकरणांवरून समोर आले आहे. काही जण बाहेर जाऊन ड्रग्ज घेऊन पुण्यात येत असल्याचेही दिसून आले आहे.
आरोपींची साखळी शोधणे अधिक कठीण
पुण्यातील पेडलरसोबतच या साखळीतील ‘बिग शॉट’ किंवा मोठे मासे पोलिसांच्या जाळ्यात सापडलेले नाहीत. अटक होणारे बहुतेकजण हे मधल्या पातळीवरील वितरक, वाहतूकदार किंवा ड्रग कुरिअर्स असतात. त्यामुळे एका पेडलरच्या जागी दुसरा सहजपणे तयार होतो, आणि ड्रग्सचा प्रवाह थांबत नाही. त्यामुळे पोलिसांना या आरोपींची साखळी शोधणे अधिक कठीण बनले आहे.
पेडलर पुन्हा अॅक्टीव्ह होतात
पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर अटक आरोपी जामिनावर सुटून पुन्हा ड्रग्ज वितरणात सहभागी होत आहेत. पोलिसांसाठी या पेडलरचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर हे पेडलर वेगवेगळ्या पद्धतीने किंवा शहराच्या बाहेरून पुण्यात पुरवठा करतात. त्यामुळे त्यांना रोखण्यात पोलिसांना अडचणी येतात. गेल्या चार वर्षात ४९३ एनडीपीएसच्या गुन्ह्यात ७०५ पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे. पेडलर्सच्या या जाळ्यात अनेक तरुण अडकत चालले आहेत. पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सतत मोहिमा राबवल्या असल्या तरी मुख्य साखळी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश येत नाही.
गांजा कसा रोखायचा?
ड्रग्ज म्हणजेच, कोकेन, एमडी, चरस तसेच तत्सम हायप्रोफाईल अमली पदार्थाला काही प्रमाणात तरी पोलिसांनी रोखले असले तरी पुण्यातील गांजा कसा रोखायचा असा प्रश्न आहे. या ड्रग्जवर जोरदार कारवाईनंतर पुण्यातील गांजाची मागणी वाढल्याचे वास्तव आहे. गांजा कारवाईतूनच हे समोर आलेले आहे. सातत्याने पोलिस कारवाई करत असताना गांजाची आवक पुण्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले जाते. ठरावीक भागात गांजा अगदीच सहजरित्या उपलब्ध होतो. गांजा किंवा इतर ड्रग्ज देताना देखील ओळखीतील किंवा सतत घेणाऱ्या व्यक्तींनाच तो विकला जातो.
चार वर्षांची कारवाई दृष्टीक्षेपात
वर्ष – नोंदवलेले गुन्हे- अटक आरोपी
२०२२- १५०- २००
२०२३- १३५- १९३
२०२४- १२९- २०४
२०२५- (जून अखेर) ७९- १०८