संग्रहित फोटो
पुणे : श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरूष भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी कडेकोट पोलिस तैनात असताना देखील या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांकडून साध्या गणवेशातील पोलिस व इतर पथके असतानाही या चोऱ्या घडल्या आहेत. एकूण ११ घटना घडल्या असून, त्यापैकी ९ घटना एकट्या हडपसर परिसरात नोंदविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी ८९ सशंयितांना पकडले होते. पण, तरीही या घटना घडल्या आहेत. मांजरी, समर्थ तसेच हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी एकूण ३ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटना दर्शनासाठी आल्यानंतर घडल्या आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडतात. पालखी मार्ग देखील गर्दीने भरून गेलेला असतो. पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात येतो. मात्र, अशा स्थितीत देखील चोरटे मात्र त्यांची कामगिरी चोख पार पाडत असल्याचे दिसत आहे.
वारी सोहळ्यात त्यात विशेषत: हडपसर भागात दरवर्षी अशा घटना घडत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या घटनांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलिसांकडून प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश येत नसल्याचे दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही, ड्रोन आणि तांत्रिक यंत्रणा तैनात असतानाही चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावल्या आहेत. वारकरी आणि नागरिकांनीही गर्दीत मौल्यवान दागिने वापरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु
‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक
ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची ४ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील लुल्लानगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून काम केल्यास चांगले पैसे मिळतात, असे आमिष दाखविले होते. महिलेला सुरुवातीला एक काम दिले. या कामाचे पैसे महिलेच्या खात्यात जमा करण्यात आले. परतावा मिळाल्यानंतर महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने चार लाख ३१ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर तिला परतावा देण्यात आला नाही. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.






