संग्रहित फोटो
बारामती : बारामती तालुक्यातून एक मोठी समोर आली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पणदरे (ता: बारामती) येथे घडली आहे. निलेश रामदास जगदाळे( वय २१, रा. पंणदरे) हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी बाल न्यायालय, पुणे येथे केली आहे. उर्वरित मुलांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या कॉलेज समोर रस्त्याने निलेश जगदाळे जात असताना कॉलेजच्या गेटच्या आत काही मुलांमध्ये भांडण चालू होते. जगदाळे हे गेटमधून आत मध्ये गेले, तेव्हा मुलांमध्ये एकमेकांना पाहण्यावरून भांडणे सुरू होती. ही भांडणे मिटवायची म्हणून जगदाळे आणि सगळी अल्पवयीन मुले पणदरेच्या सूतगिरणी परिसरात पोहोचल्यानंतर दोन गटातील अल्पवयीन मुलांच्या भांडणात एका मुलाने जगदाळे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तो वार चुकवण्याच्या प्रयत्नात जगदाळे याच्या दोन्ही हातावर कोयत्याचे वार झाले. त्यात तो गंभीर जखमी झाला.
आता बारामती शहर पाठोपाठ ग्रामीण भागात ही कोयत्याचे वारे पसरायला लागले असून, लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात पोलिस यंत्रणा या कोयता गँगवर अंकुश कधी ठेवणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरार झालेल्या गुंडाला पकडले
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! वारजे भागात तरुणावर कोयत्याने हल्ला, सपासप वार केले अन्…