संग्रहित फोटो
पुणे : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचारप्रकरणानंतर शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालेला असताना वाघोली भागात सकाळी शाळेत जाण्यासाठी पायी निघालेल्या चिमुकलीला चॉकलेट देऊन गिरणीत नेहून अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी भेदरला आणि मुलगी बाहेर आली. ती रडत रस्त्याच्या कडेला उभारली असता तिला नागरिकांनी पाहिले. त्यानतंर हा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला पकडले आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २७ वर्षीय नराधम तरुणाला पकडले आहे. याबाबत पिडीत मुलीच्या कुटूंबियांनी तक्रार दिली आहे. यात पावणे दहा वर्षांची मुलगी पिडीत झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाघोली भागात कुटुंबीयांसह राहते. नेहमीप्रमाणे ती सकाळी साडे सातच्या सुमारास घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर पिठाची गिरणी आहे. आरोपी पिठाच्या गिरणीत कामाला आहे. दरम्यान रोज ही मुलगी याच रस्त्याने शाळेत ये- जा करते. आरोपी तरुणाला ही बाब माहिती होती. सकाळी मुलगी शाळेत जात असताना पीठाच्या गिरणीजवळ आली. तेव्हा आरोपीने तिला अडवले. चॉकलेट देण्याचं अमिष दाखवले. तसेच, तिला पीठाच्या गिरणीत नेले. त्याठिकाणी तिच्याशी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान तिने आरडाओरडा केला. मुलगी बाहेर पडली. ती रस्त्यावर उभे राहून रडत होती. मॉर्निंग वॉक करणाऱ्या काही नागरिकांनी तिला पाहिले व विचारपूस केली. तेव्हा प्रकार समोर आला. लागलीच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला पकडले.