संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि साथीदारांनी दुचाकीस्वार तरुणासह मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय राजन लोणकर (वय २९, रा. विठाई पार्क सोसायटी, कसबा पेठ), ललित आढाव (वय २४, रा. कसबा पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक सचिन महादेव मिसाळ (वय ४८ ,रा. कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेला साथीदार सम्राट विजय सणस (वय २७, रा. कानिफनाथ सोसायटी, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लोणकर याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर आणि त्याचा मित्र आढाव हे शुक्रवारी (७ मार्च) कोथरूड भागातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघे जण विवाह समारंभ आटोपून निघाले होते. एमआयटी महाविद्यालयाकडून पौड रस्त्याकडे वळण घेत असातना दुचाकीस्वार लोणकर आणि रिक्षाचालक मिसाळ समोरासमोर आले. मिसाळ आणि लोणकर यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यानंतर मिसाळने दोघांना शिवीगाळ केली.
रिक्षाचालकाने साथीदार सणस याला बोलावून घेतले. लाेणकर आणि आढाव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मिसाळने त्याच्याकडील चावी डोक्यात मारल्याने आढाव आणि लोणकर जखमी झाले. त्यानंतर मिसाळ आणि साथीदार पसार झाला. जखमी अवस्थेतील लोणकर आणि आढाव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन रिक्षाचालक मिसाळ याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहायक निरीक्षक चेतन धनावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक अडागळे अधिक तपास करत आहेत.