संग्रहित फोटो
पुणे : बिबवेवाडीत पुन्हा टोळक्याने दहशत माजवल्याची घटना घडली असून, अल्पवयीन मुलांनी कोयते उगारून वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात दहशत माजवत प्रचंड गोंधळ घातला. अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. तोडफोड प्रकरणात दोघांना अटक केली आहे.
गणेश कोळी (वय २०) आविष्कार भालेराव (वय २०, दोघे रा. रा. नवीन पद्मवतीनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गणेशचा पद्मावतीनगर भागात काही जणांशी वाद झाला होता. वादावादीतून त्याला मारहाण केली गेली होती. मारहाणीचा बदला घेण्यासाठी गणेश, अविष्कार व अल्पवयीन मुले शुक्रवारी रात्री पद्मावतीनगर येथे कोयता आणि लाकडी दांडके घेऊन गेले होते. गणेशला मारहाण करणारे दिसले नाहीत. नंतर तेथून जाताना आरोपींनी रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा कोयते आणि दांडक्याने फोडल्या. कोयते उगारून त्यांनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ केली. आरोपींनी रिक्षासह दुचाकींची तोडफोड केली.
तोडफोडीच्या आवाजाने रहिवाशी बाहेर आले. तेव्हा आरोपींनी त्यांना कोयते आणि दांडक्याचा धाक दाखविला. रहिवाशांनी तोडफोडीचे चित्रीकरण मोबाइलमध्ये केले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा व बिबवेवाडी पोलिसांनी धाव घेतली. पसार झालेल्या अल्पवयीनांसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तोडफोड करणारे मुले १२ ते १७ वयोगटातील आहेत. वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक असोक येवले तपास करत आहेत.
बिबवेवाडीत तोडफोडीची दुसरी घटना
गेल्या वर्षी बिबवेवाडी भागात टोळक्याने ४० वाहनांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर खून प्रकरणात जामीन मिळवून बाहेर पडलेल्या सराइतावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. बिबवेवाडी भागातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे या भागातील रहिवाशी दहशतीखाली आहेत.