पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला; गावच्या जत्रेतच केलं लक्ष्य (File Photo : Nilesh Ghaywal)
धाराशिव : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्यातील एका गावच्या जत्रेत उपस्थित राहिला होता. त्यावेळी एका पैलवानाने त्याच्यावर हल्ला केला. कुस्तीच्या फडात अशाप्रकारे कुख्यात गुंडावर हल्ला झाल्याने घटनास्थळी खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरूड गावात निलेश घायवळ हा जत्रेनिमित्त आला होता. येथील ग्राम दैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने गावात कुस्तीचा फड भरवला होता. याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी राज्यभरातून मल्ल उपस्थितीत होते. या जत्रेत भरवलेल्या कुस्तीच्या मैदानात पैलवानांना भेटण्यासाठी गेला असता, अचानक त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला एका पैलवानानेच केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, निलेश घायवळ याच्यावर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा तो आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत होते. तसेच प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत अचानक निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा हा पैलवानच असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा तो असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
निलेश घायवळ याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशाप्रकारे एका कुख्यात गुंडावर भरमैदानात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निलेश घायवळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल
गुन्हेगार निलेश घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता. त्यानंतर आता त्याच्यावर हलल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.