'आज तुझा गेम करतो' असे म्हणत तरुणावर कोयत्याने हल्ला; केवळ मित्र मदतीला आला म्हणून...(Crime File Photo)
यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने कोयत्याने हल्ला केला. ऐनवेळी संबंधित तरुणाने प्रसंगावधान राखल्याने आणि मित्र वाचवण्यासाठी आल्याने सुदैवाने त्याचा जीव बचावला. ही गंभीर घटना मंगळवारी (दि.17) दुपारी तीनच्या सुमारास येथील वाघापूर मार्गावरील नाना-नानी पार्कमध्ये घडली.
गौरव बलराम रोकडे (वय 20, रा. बोदड) असे जखमीचे तर अभिजित रामराव वानखडे (रा. पंचशिलनगर, वाघापूर) असे आरोपीचे नाव आहे. तो त्याच परिसरातील डायाभाई पटेल शाळेच्या प्रांगणावर गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेट खेळायला जातो. यादरम्यान तेथे क्रिकेट खेळायला येणारा आरोपी अभिजितशी त्याची ओळख झाली. दरम्यान, क्रिकेट खेळताना अनेकदा त्यांच्यात वादही झाले. दरम्यान, मंगळवारी दुपारी गौरव हा त्याचा मित्र सुजल देवानंद करे (रा. मोहा) याच्यासोबत नाना-नानी पार्कमध्ये बसून होता. यावेळी आरोपी अभिजित तेथे हातात कोयता घेऊन आला.
तसेच ‘आज तुझा गेम करतो’, असे म्हणत त्याने गौरववर हल्ला चढवला. यावेळी गौरवने प्रसंगावधान राखून तो वार चुकवला. त्यानंतर सुजल त्याच्या मदतीला धाऊन आला. तेव्हा पुन्हा आरोपीने गौरववर वार केला. त्यामध्ये त्याच्या पायाला दुखापत झाली. या झटापटीत गौरवने तेथून पळून गेला. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव बचावला. या घटनेनंतर त्याने लोहारा पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून आरोपी अभिजितविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास लोहाराचे प्रभारी ठाणेदार रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पोलिस करत आहेत.
हॉर्न का वाजवला म्हणून कोयत्याने हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, पिकअपला बुलेट आडवी लावून हॉर्न का वाजवला? या कारणावरून शिवीगाळ करून कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना बीड शहरातील साठे चौक परिसरात घडली. या घटनेत दोघे जण जखमी झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात तरूणांवर गुन्हे दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणातील हल्लेखोरांपैकी एकावर जिल्हा रूग्णालयात तर दुसऱ्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.