बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक
शिरोली : बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे प्रकरण कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीत घडले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. कल्लेश चंद्रकांत खेकरे (वय २५, रा. लोहार गल्ली, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) व बाबू बाळू पवार (२०, रा. वारणा कडोली, ता. पन्हाळा ) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुलाची शिरोली येथील यादव वाडीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील कवळेकर यांनी याबाबतची फिर्याद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी राजकुमार चक्रवर्ती (वय २२, रा. नांदणी रोड, संभाजीनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) व पुण्याच्या लता साहू या दोघी बांगलादेशी महिलांचा दहशतवाद विरोधी पथकाकडून शोध घेणे सुरू होते.
हेदेखील वाचा : Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी
पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे, हे पथक पुलाची शिरोली येथील यादव वाडी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये पोहोचले. तेथील विंग ए च्या रूम क्रमांक २०१ व विंग बी च्या रूम क्रमांक २०३ मध्ये दोन्ही महिला मिळाल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता खेकरे व पवार यांनी त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केल्याची माहिती मिळली.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल; दोघांना अटक
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल हँडसेट, टीव्ही, होंडा सिटी कंपनीची कार व वेश्या व्यवसायासाठी पूरक साहित्य असे एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कल्लेश खेकरे व बाबू पवार यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.