बीड: ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका युवकाच्या छातीत गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला की त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली यावर गूढ कायम आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अंभोरा हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्यालगत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह दिसून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी याचा अधिक तपास केला तेव्हा मयूरच्या छातीत गोळी लागण्याची जखम आणि मृतदेहाजवळ पडलेले पिस्तूल आढळून आले. मयूर चव्हाण हा मिस्त्री काम करत होता. त्यामुळे त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूल आले कुठून? त्याची हत्या आहे की आत्महत्या याबाबतचे गूढ कायम आहे. घटनेचा अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत. मात्र ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गंभीर मारहाणीचे दोन प्रकार बीडमध्ये! महिलेला डोक्याला 14 टाके, चायनिज सेंटरवर शस्त्र हल्ला
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शुल्लक कारणावरून अंजनवती गावात एका महिलेला गंभीर मारहाण करण्यात आली असून तिच्या डोक्याला तब्बल 14 टाके पडले आहेत. तर दुसऱ्या घटनेत केज शहरात चायनिज सेंटर चालविणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
अंजनवती गावात महिलेला गंभीर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात याच गावात शेतीच्या वादातून एका महिलेला मारहाण झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अंजनवतीत महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमी महिला प्रियंका गाढवे या असून, तिच्या डोक्याला शेतीच्या अवजाराने खोल जखम झाली आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिस जबाब नोंदविणार आहेत.
दुसरीकडे, बीडच्या केज शहरात धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उशिरा रात्री घडली.सय्यद इर्शाद नावाचा युवक बसस्टँडसमोर चायनिज सेंटर चालवत असताना, चार ते पाच जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी सांगितले की, इर्शादचा जबाब घेतल्यानंतर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाणार आहे.