Beed : बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनकरते विविध मागण्या मान्य करण्यासाठी आत्मदहन किंवा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तासोबतच रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांनाही तैनात करावे लागते. अशा प्रकारचे अनाठायी आंदोलन केल्याने शासनाच्या मनुष्यबळ आणि यंत्रणेचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे बंदोबस्तासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा खर्च वसूल करण्याची भूमिका बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घेतली आहे. गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या एकाला साडेतीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
सुरक्षारक्षकाचीच सुरक्षा धोक्यात; चाकूने भोसकून केली हत्या, मध्यरात्री घडला थरार
वाल्मिक कराडचा आणखी एक क्रूर चेहरा समोर
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या एका जुन्या सहकाऱ्याने धक्कादायक दावा केला. यामध्ये त्याने वाल्मिक कराडने महादेव मुंडे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचाही खून केल्याचे म्हटले आहे.
विजयसिंह बांगर असे या व्यक्तीचे नाव आहे. महादेव मुंडे हत्याप्रकरण आता तापले असून, बुधवारी त्यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिला. त्यातच आता वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी शहरात 15 महिन्यांपूर्वी झालेल्या मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आहे.
व्यावसायिक महादेव मुंडे यांचा निर्घृणपणे खून परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर करण्यात आला होता. मात्र, हा खून कोणी केला आणि कशासाठी केला, त्याचा तपास पोलिसांकडून होऊ शकला नाही. या प्रकरणाची दखल आमदार सुरेश धस यांनी घेतली. त्यांनी या प्रकरणाची तपासाची मागणी केल्यानंतर आता या तपासणीच्या कामाला वेग आला आहे.
मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. परंतु पोलिस आमच्याकडूनच पुरावे मागत आहेत. ते काम त्यांचे आहे, त्यांनी आरोपी आणि पुरावे शोधले पाहिजे. बीड पोलिसांपुढे आव्हान आहे. हे आव्हान त्यांनी स्वीकारून महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तळापर्यंत तपास केला जावा, असे विजयसिंह बांगर म्हणाले.