फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता अक्षर कोठारी आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे. त्याची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ देशभरातील मराठी प्रेक्षकांमध्ये मोठ्या संख्येने पाहिली जात आहे. मालिकेमुळे अक्षरलाही फार प्रसिद्धी मिळाली असून त्याच्या चाहत्यांकडून वेळोवेळी त्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात येते. पण त्याच्या या अभिनय प्रवासाला कशी सुरुवात झाली? याबद्दल सांगताना एका मुलाखतीत त्याने आदेश बांदेकर यांच्याविषयी विधान केले आहे.
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर लवकरच मराठी मालिकांमध्ये झळकणार आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमध्ये मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आदेश बांदेकर स्वतः त्या क्षणांसाठी विशेषतः उपस्थिती लावणार आहेत. अशामध्ये नुकतेच चर्चेत असणाऱ्या मुलाखतीत मालिकेत मुख्य पात्र साकारणारा अभिनेता अक्षर कोठारीसह आदेश बांदेकरही उपस्थित होते. त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात आणि आदेश बांदेकर यांच्याशी असलेली त्या क्षणांची नाळ काय आहे? हे सांगितले आहे.
अक्षर कोठारी म्हणतो की,” मी कॉलेजमध्ये असताना एकदा एकांकिका स्पर्ध्येत भाग घेतला होता. तेव्हा आमची टीम जरी विजय झाली नसली तरी मला माझ्या अभिनयासाठी आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षीस मिळाले होते. त्यांनी विशेषतः माझ्या अभिनयासाठी मला बक्षीस दिले होते. याला योगायोग म्हणावे की समजेना. पण तेव्हा ते क्षण घडले आणि आता मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.”
अक्षर कोठारीने पुढे सांगितले की,”आम्ही आमच्या त्रुटी जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आमचे मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी जो आम्हाला सल्ला दिला तो माझ्यासाठी लाईफ चेंजिंग ठरला. आज मी जे काही या क्षेत्रात आहे, हे त्या सल्ल्यामुळेच!”
काय होता आदेश बांदेकर यांचा सल्ला?
सल्ला असा होता की अक्षर कोठारी हा मूळचा सोलापूरचा! तिथे शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन एकांकिका स्पर्ध्येत त्याच्या टीमला विजयी होता आले नाही. त्याचे कारण आणि आपल्या कामातील त्रुटी जाणून घेण्यासाठी त्याची टीम यांनी त्या कार्यक्रमावेळी मान्यवर म्हणून उपस्थित असणारे आदेश बांदेकर यांची भेट घेतली. तेव्हा आदेश बांदेकर त्यांना म्हणतात की,”तुम्हा सोलापूरकरांनी मुख्य अडचण म्हणजे तुम्ही बाहेर पडत नाही. डबक्याच्या बाहेर पडायला शिका. यश मिळेल.”
अक्षरने हे वाक्य फार मनावर घेतले आणि मुंबईत शिक्षण घेण्यासाठी तो रवाना झाला. येथे त्याने अभिनयाचे धडे घेतले. त्या मुलाखतीदरम्यान त्याने आदेश बांदेकरांचे आभार मानले आणि त्यांच्या त्या मार्गदर्शनाचे परिणाम आज मी येथे असल्याचे सांगितले.