Controversies Films 2025 (Photo Credit- File)
Controversies Films 2025: २०२५ या वर्षात बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक चित्रपट आले, काही हिट झाले तर काही फ्लॉप. पण या सगळ्यात काही चित्रपट असे होते, जे त्यांच्या कथेमुळे वादाच्या भोवऱ्यात (Controversies Films 2025) अडकले. अनेक मोठ्या आणि बहुचर्चित चित्रपटांना प्रदर्शनाआधी आणि नंतरही वादांना तोंड द्यावे लागले. या चित्रपटांमुळे देशभरात थिएटरमध्ये तोडफोड झाली, अनेक ठिकाणी एफआयआर दाखल झाले, आणि अखेर सेन्सॉर बोर्डालाही यात हस्तक्षेप करावा लागला. विशेषतः ज्या चित्रपटांचे विषय संवेदनशील होते, त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.
दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘फाईल्स’ सीरिजमधील ‘द बंगाल फाईल्स’ या नवीन चित्रपटाचा ट्रेलर कोलकातामध्येच वादात सापडला. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमावेळी पोलिसांनी स्क्रीनिंग थांबवली. तसेच, चित्रपटाच्या कथानकामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, असा आरोप करत अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले. यापूर्वी, अग्निहोत्रींच्या ‘द दिल्ली फाईल्स’ या चित्रपटानेही हिंदू नरसंहाराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण केला होता.
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांनी महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटावर ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. मोठ्या विरोधामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि सेन्सॉर बोर्डानेही काही दृश्ये वगळण्याचे निर्देश दिले. या सर्व वादांनंतर, २५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
सनी देओल, रणदीप हुड्डा आणि सैयामी खेर यांचा ‘जाट’ हा ॲक्शन चित्रपटही धार्मिक वादात अडकला. चित्रपटातील एका दृश्यावर ख्रिस्ती समाजाने आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. या विरोधानंतर निर्मात्यांना ते दृश्य चित्रपटातून वगळावे लागले.
दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील एका गाण्यामुळे आणि कथेतील ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला. महाराष्ट्रभरातील अनेक संघटनांनी याला विरोध केला. अखेरीस, सेन्सॉर बोर्डाने यात हस्तक्षेप करत अनेक कट सुचवले.
कंगना रनौत दिग्दर्शित आणि अभिनीत ‘इमरजेंसी’ हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगनाने इंदिरा गांधींची भूमिका साकारली. चित्रपटावर ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप करत अनेक वाद निर्माण झाले. अभिनयासाठी कंगनाचे कौतुक झाले असले तरी, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सरासरी कामगिरी करू शकला. एकंदरीत, हे वर्ष हे दाखवून देते की जेव्हा जेव्हा चित्रपट संवेदनशील विषयांना हात घालतात, तेव्हा त्यांना वाद आणि राजकारणाचा सामना करावा लागतो.