फोटो सौजन्य - Social Media
वसई येथे उत्तर प्रदेशातील तरुणीचा खून करून तिचे प्रेत नाल्यात टाकणाऱ्या तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये ठेवणाऱ्या प्रियकराला गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
२७ डिसेंबरपासून प्रिया शंभुनाथ सिंग (२५) ही कुडाघाट झरना टोला, गोरखपूर, उत्तर प्रदेश येथून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रियाचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस २५ फेब्रुवारी २०२५ रोजी वसईत आले आणि त्यांनी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे मदत मागितली. त्यानुसार अंबुरे यांनी गुन्हे शाखा कक्ष-३ ला तपासाचे आदेश दिले.
गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे प्रियाचा मागोवा घेतला असता, ती वारंवार वसईतील अमित सुग्रीव सिंग या तरुणाला भेटण्यासाठी येत असल्याचे आढळले. विशेषत: १६ डिसेंबर रोजी ती वसईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी अमितला चौकशीसाठी बोलावले, मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी गोळा केलेले पुरावे दाखवल्यावर अखेर त्याने खून केल्याची कबुली दिली.
अमित आणि प्रियाच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता, तसेच प्रिया सतत लग्नाचा तगादा लावत होती. त्यामुळे तिला वसईत बोलावून, फिरण्याच्या बहाण्याने पोमण, महाजन पाडा येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजजवळील मोकळ्या जागेत नेले. तेथे तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रियाचा मोबाईल राजधानी एक्सप्रेसमध्ये ठेऊन, ती दिल्लीला गेल्याचा बनाव केला.
या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात अमितविरोधात कलम १०३ (१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या टीमने तसेच यूपी पोलिस उपनिरीक्षक शिवांशु सिंग यांनी ही महत्त्वाची कामगिरी केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईचे कौतुक होत आहे.