सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : दिघी, आंळदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत दोन आरोपींना गुन्हे शाखेने ७२ तासात अटक केली आहे. त्या आरोपींकडून १२ जबरी चोरीचे तसेच एक वाहन चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे. यव्हाण भास्कर कासार (वय24, रा. सणसवाडी, पुणे) आणि विश्वजीत अर्जुन पवार (वय23, रा. मुकुदवाडी, संभाजीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आंळदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी आरोपींनी नागरिकांना चाकूचा धाक दाखवून मौल्यवान वस्तु जबरीने हिसकावून नेल्या होत्या. या घटनेबाबत तात्काळ दिघी पोलीस व आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आरोपी विश्वजीत अर्जुन पवार हा जालना जिल्ह्यात चार गुन्ह्यात वॉन्टेड होता.
ही कामगिरी मालमता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिंतेद्र कदम, खंडणी विरोधी पथकांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देंवेद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडील पोलीस हवालदार मोरे, गडदे, पोलीस नाईक कोकणे, पोलीस शिपाई कदम, आत्तार, खंडणी विरोधी पथकाकडील सहायक पोलीस फौजदार कानगुडे, पोलीस हवालदार जाधव, पोटे, गोडांबे, गुन्हे शाखा युनिट-०३ कडील पोलीस हवालदार सोनवणे, साबळे, पोलीस शिपाई राळे, तांत्रिक विशलेषण विभागाचे पोलीस हवालदार ननावरे यांनी केली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.