खुनाच्या उद्देशाने अपहरण केलेल्या व्यापाराची 24 तासात सुटका, वाशिममधून तिघांना अटक तर व्यापारी सुखरूप (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य, नवी मुंबई: भाजीमालाचे आयात निर्यात करणारे व्यापारी पंकेश संजय पाटील यांचे आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून अपहरण केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दहा पथके स्थापन केली. त्यानुसार घटनास्थळाचे नवी मुंबई, ठाणे परिसरातील सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर, अपहरण कर्त्याची 24 तासात वाशिम मधून सुखरूप सुटका केली आहे. तर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पंकेश संजय पाटील व त्याचे व्यावसायिक भागीदार प्रशांत आप्पासाहेब खैरनार यांचा भाजीपाल्याचा आयात निर्यात करण्याचा व्यवसाय आहे. ऋषिकेश इंद्रभूषण इंगोले यांनी त्याच्या जवळील कांदा दुबईला निर्यात करण्यासाठी पंकज पाटील यांना दिला होता. त्याचे पैसे पंकेश पाटील यांनी ऋषिकेश यांना दिले नव्हते. गेल्या अनेक वर्षांपासून ऋषिकेश हे पंकेश यांना पैशांची मागणी करत होते. यातूनच अनेकदा त्यांचे वाद देखील झाले. या आर्थिक देवाण-घेवांच्या वादातून ऋषिकेश व त्याच्या अन्न दोन साथीदारांनी पंकेश व त्याचा व्यावसायिक भागीदार प्रशांत खैरनार या दोघांना अक्षर बिजनेस पार्क समोर गाठून मारहाण केली, व पंकज पाटील यांना गाडीत टाकून घेऊन गेले.
प्रशांत खैरनार यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार देताच, गुन्हे शाखा कक्ष 1, गुन्हे शाखा कक्ष 2, मध्यवर्ती गुन्हे शाखा यांची तीन पथके, तसेच परिमंडळ 1 मधील पोलिसांची 5 पथके व एपीएमसी पोलिसांची 2 अशी एकूण 10 पथके स्थापन केली. पथकाने घटनास्थळ, संपूर्ण नवी मुंबई व ठाणे परिसरातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेची तपासणी केली. तसेच तांत्रिक तपास केला असता, आरोपी हे वाशिम तालुक्यातील कलम गव्हाण या गावी असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने 24 तासाच्या पंकेश पाटील यांची सुखरूप सुटका केली. तर ऋषिकेश इंद्रभूषण इंगोले, वय 25 वर्ष, मंगेश किसन अस्तरकर, वय 23 वर्ष, सागर नरेंद्र मनवर, वय 25 वर्ष, तिघेही राहणार वाशिम यांना अटक केली आहे. न्यायालयाने तीनही आरोपीना पोलीस कोठडी सुनावली असून एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.