'ऑपरेशन शोध' अंतर्गत 330 महिला, मुली, बालकांचा छडा (फोटो सौजन्य-X)
सावन वैश्य | नवी मुंबई:- नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतून हरवलेल्या महिला, पुरुष तसेच बालकांना शोधण्यासाठी ‘ऑपरेशन शोध’ राबवण्यात आले होते. या ऑपरेशन दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी महिला, पुरुष, अपहरण झालेले मुलं व मुली अश्या एकूण 330 जणांचा शोध घेतला आहे.
पोलीस महासंचालक यांनी महाराष्ट्र राज्यातील हरवलेल्या महिला व बालकांच्या संदर्भात विशेषतः १ वर्ष उलटुन गेलेल्या महिलांच्या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालुन महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन शोध” हि विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर “ऑपरेशन शोध” साठी पोलीस ठाणे स्तरावर एकूण २० पथके व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडील २ पथके तयार करण्यात आली होती.
तसेच बाल कल्याण समिती, कर्जत, ठाणे, उल्हासनगर, अधीक्षक, बाल निरीक्षण गृह, रायगड, ठाणे, त्याचबरोबर नवी मुंबई आयुक्तालयातील विविध एनजीओ यांच्याशी समन्वय साधुन शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे स्तरावर “ऑपरेशन शोध” मोहिमेअंर्तगत विशेषतः हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये २१३ महिला, ९५ पुरुष, १० अपहृत मुले, १२ अपहृत मुली असे एकुण ३३० मिळुन आले आहेत. नवी मुंबईतील हरवलेल्या महिला व बालकांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरीकांनी १०३ या हेल्पलाईन वर माहिती देण्याचे नवी मुंबई पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता, अपहरण दाखलचे प्रमाण जत आणि इस्लामपूर येथे सर्वाधिक आहे. जत पोलीस ठाण्यात १०५ आणि उमदी पोलीस ठाण्यात २९ मिसिंग दाखल आहेत. यापैकी जत पोलिसांनी १५ जणांना शोधले आहे तर उमदी पोलिसांनी अवघ्या चौघांचा शोध घेतला आहे. इस्लामपूर पोलिसांकडे ९५ महिला, आठ मुले आणि तीन मुली बेपत्ता झाल्याचे दाखल होते त्यातील ५४ महिलांना शोधण्यात यश आले आहे. शिराळा, कोकरूड आणि कुरळपमध्ये मिसिंगचे प्रमाण कमी आहे. तीन पोलीस ठाणे मिळून ३९ मिसिंग दाखल आहेत यातील ११ जणांना शोधण्यात यश आले आहे.